मुंबई : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो-९ मार्गिकेचा दहिसर-काशिगाव टप्पा १ आणि मेट्रो-२ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा १ यांचे लोकार्पण शुक्रवारी ३ एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यासोबतच पॉड टॅक्सीचे भूमिपूजनही केले जाणार आहे.
दहिसर ते गुंदवली मेट्रा- ७ मार्गिकेचा उत्तर टोकाकडील विस्तार म्हणजे मेट्रो-९ मार्गिका. या मार्गिकेच्या दहिसर ते काशिगाव या पहिल्या टप्प्याचे काम गेल्या वर्षअखेरीस पूर्ण झाले होते. जानेवारीत सीएमआरएस प्रमाणपत्रही मिळाले. तसेच अंधेरी पश्चिम ते मंडाळे मेट्रो-२ ब मार्गिकेच्या मंडाळे ते डायमंड गार्डन या पहिल्या टप्प्याला सीएमआरएस प्रमाणपत्र मिळूनही लोकार्पण रखडले आहे. मेट्रो-९ सुरू झाल्यास गुंदवलीपासून थेट काशिगावपर्यंत मेट्रोने प्रवास करता येईल. तसेच मेट्रो-२ ब सुरू झाल्यास पूर्व उपनगराला पहिली मेट्रो मिळणार आहे. मेट्रो-२ ब मार्गिकेचा पहिला टप्पा ५.५३ किमी लांबीचा आहे, तर मेट्रो-९ मार्गिकेचा पहिला टप्पा ४.४ किमीचा आहे. वांद्रे रेल्वे स्थानकापासून ते कुर्ला रेल्वे स्थानकापर्यंत पॉड टॅक्सी प्रकल्प उभारला जाणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात रोज ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या प्रवासाची सोय यामुळे होईल, असे सांगितले जाते. या प्रकल्पाची उभारणी आणि संचालन करण्यासाठी वर्षभरापूर्वीच संस्थेची नियुक्ती केली आहे. मेट्रो प्रकल्पांच्या लोकार्पणासोबतच पॉडटॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजन केले जाणार आहे.







