शिर्डी : श्रीरामनवमी उत्सवाची शिर्डीत भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली. आज उत्सवाचा मुख्य दिवस असल्यानं साई दर्शनासाठी लाखो भाविकांची मांदियाळी शिर्डीत दिसून येत आहे. साईनामाचा जयघोष करत शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. उत्सवासाठी साईबाबा मंदिरावर विद्युत रोषणाई तसंच साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय.
शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीनं यंदा ११५ वा श्रीरामनवमी उत्सव साजरा केला जात आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे काल पहाटेपासून द्वारकामाई येथे सुरू असलेल्या साईसच्चरित्र पारायणाची आज उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे सांगता झाली. त्यानंतर साईसच्चरित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थ आणि भाविकांनी कावडीतून आणलेल्या गोदावरीच्या पाण्याची विधीवत पूजा साई संस्थानचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर साईबाबा मूर्ती आणि साई समाधीला जलाभिषेक करण्यात आला. साईबाबांना मंगलस्नानही कावडीतून आणलेल्या जलानं करण्यात आलं. आज मध्यान्ह आरती अगोदर साई मंदिरासमोर श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येणार असून, हजारो भाविक रामजन्माचं मोठ्या भक्तीभावानं स्वागत करतात. शिर्डीतील श्रीरामनवमी उत्सवाचे यंदाचे हे ११५ वे वर्ष आहे. भाविकांमध्ये साईभेटीचा आनंद ओसंडून वाहत आहे. श्रीरामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. श्रीरामनवमी उत्सवात सहभागी होण्यासाठी देशभरातून भाविक येथे येत असतात. शिर्डीचा उत्सव हा भाविकांसाठी आनंद सोहळा असतो. साईबाबांच्या भेटीसाठी आतूर झालेला भक्तगण साई मूर्तीची केवळ एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतो. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवातील ऊर्जा भाविकांना वर्षभर पुरणारी असते. त्यामुळेच हा उत्सव ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक साई दरबारी दाखल झाले आहेत. जास्तीत जास्त भाविकांना साईदर्शनाचा लाभ मिळावा याकरिता साईबाबा मंदिर आज दर्शनासाठी रात्रभर खुलं ठेवण्यात येणार आहे.







