पुणे : मराठी नववर्षाचा उत्साह आणि गुढी पाडव्याचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, राज्यात गॅस टंचाईच्या समस्येने डोके वर काढले आहे. गॅस एजन्सीबाहेर लागणाऱ्या नागरिकांच्या लांबच लांब रांगा आणि व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यात झालेली कपात यामुळे सर्वसामान्य जनता हतबल झाली आहे. या पार्श्वभूमीवर, पुणेकरांसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे.
पुणे जिल्ह्यातील गॅस वितरण व्यवस्था सुधारावी आणि नागरिकांची ओढाताण थांबावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गॅस कंपन्या आणि एजन्सींना कडक आदेश दिले आहेत. आता ग्राहकाने गॅस बुकिंग केल्यानंतर जास्तीत जास्त ९६ तासांच्या (४ दिवसांच्या) आत त्याला गॅस सिलेंडर घरपोच द्यावा लागणार आहे. या नवीन वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी एक महत्त्वाचा नियम लागू करण्यात आला आहे. ग्राहकाने आपला ‘डिलिव्हरी कोड’ सांगितल्याशिवाय त्याला सिलेंडर दिला जाणार नाही. यामुळे काळाबाजार रोखण्यास मदत होईल आणि खऱ्या गरजू ग्राहकाला वेळेत गॅस मिळेल. गॅस वितरण केंद्रांवर होणारी गर्दी आणि रांगा पाहता, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस विभागाला विशेष सूचना दिल्या आहेत. गॅस एजन्सी आणि गोदामांच्या ठिकाणी पोलिसांची नियमित पाहणी आणि गस्त असावी. वितरणावेळी गॅस एजन्सीने मदत मागितल्यास पोलिसांनी ती त्वरित उपलब्ध करून द्यावी. वितरणात अडथळा आणणाऱ्या किंवा बेकायदेशीर हस्तक्षेप करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.







