महाड : उच्च शिक्षणासोबतच बदलत्या स्पर्धात्मक युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (ए.आय.) आधारित ज्ञान व कौशल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन प्रिव्ही स्पेशलिटी केमिकल्स प्रा. लि.चे व्हाइस प्रेसिडेंट रामचंद्र सुर्वे यांनी केले. हिरवळ एज्युकेशन ट्रस्टतर्फे महाड तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या ए. आय. अभ्यासक्रम सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ट्रस्टचे चेअरमन किशोर धारिया यांनी हे सेंटर म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याची नांदी असल्याचा विश्वास व्यक्त केला. महाड तालुक्यात प्रथमच ए.आय. तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण व प्रशिक्षण देणारे सेंटर हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून सुरू करण्यात आले असून, अशा प्रकारचे प्रशिक्षण सुरू करणारी हिरवळ ही तालुक्यातील एकमेव संस्था ठरली आहे.
महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रिव्ही स्पेशलिटी केमिकल्स प्रा. लि. यांच्या सहकार्याने या सेंटरची स्थापना केली आहे. रामचंद्र सुर्वे यांच्याहस्ते बुधवारी सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन किशोर धारिया, प्रिव्हीतर्फे विनोद देशमुख व पराग हेलेकर, रंगसुगंध अध्यक्ष सुधीर शेठ, ट्रस्ट डायरेक्टर सोनाली धारिया, विश्वस्त संतोष बुटाला, शाळेच्या मुख्याध्यापिका वासंती राजप्पन, महाविद्यालय प्राचार्य सुदेश कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.






