मुंबई : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) घेण्यात येणाऱ्या ‘सीईटी २०२६’ परीक्षांसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी आधार प्रमाणीकरण आणि अपार आयडी अनिवार्य करण्यात आल्याची माहिती सीईटी कक्षाने दिली. शैक्षणिक वर्ष २०२६ साठी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षांचे ऑनलाइन अर्ज लवकरच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत.
सीईटी कक्षाच्या सूचनेनुसार, सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी त्यांच्या आधार कार्डवरील तपशील अद्ययावत करणे आवश्यक आहे. नाव, जन्मतारीख, छायाचित्र, पत्ता, वडिलांचे नाव, तसेच आधारशी संलग्न मोबाइल क्रमांक आदी तपशील योग्य आणि अद्ययावत असणे बंधनकारक आहे. आधारशी मोबाइल क्रमांक लिंक व सक्रिय असणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. तसेच ‘सीईटी २०२६’साठी नोंदणी करताना ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री अर्थात अपार आयडी सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांनी वेळेत अपार आयडी तयार करून ठेवावा, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.







