नवी मुंबई: नवी मुंबई विमानतळावर येत्या तीन दिवसांत उड्डाणांना सुरुवात होणार असून, येथे प्रवाशांसाठी मोठ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. २५ डिसेंबरपासून कार्यान्वित होणाऱ्या या विमानतळावर सध्या चाचणी फेऱ्या सुरू असून, त्याचे व्हिडिओदेखील शेअर केले जात आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याच्या उद्देशाने अदानी समूहाकडून OneApp सुरू करण्यात येणार आहे.
विमानतळावर पॅसेंजर कम्युनीकेशन सिस्टम सुरू करण्यात येणार असून, त्यासोबतच प्रवाशांना मोफत Wi-Fi सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. OneApp हा प्रवाशांसाठी व्हर्च्युअल सहाय्यक काम करेल. रेल्वेच्या m-Indicator प्रमाणेच हा अॅप प्रवाशांना फ्लाइटविषयक अपडेट्स देईल. तसेच विमानतळावरील महत्त्वाच्या ठिकाणांपर्यंत पोहचण्यासाठी मार्गदर्शनही करेल. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावरील वेळेचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करता येणार आहे. या संपूर्ण टर्मिनलमध्ये 10 Mbps पर्यंत वेगाने मोफत Wi-Fi सुविधा देण्यात येणार आहे. विमानतळ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गर्दीच्या वेळीही नेटवर्कमध्ये खोळंबा न होण्यासाठी ही प्रणाली बनवण्यात आली आहे. त्यामुळे मेसेजिंग, डिजिटल पेमेंट, अॅप-आधारित टॅक्सी बुकिंग, ई-मेल, स्ट्रीमिंग आणि व्हिडिओ कॉल सहज शक्य होणार आहेत. याशिवाय नवी मुंबई विमानतळाने BSNL सोबत भागीदारी केली असून, त्यामुळे नेटवर्क कनेक्टिव्हिटीसंबंधी कोणत्याही अडचणी येणार नाहीत.







