मुंबई : मिशन ऑलिम्पिक २०२६ अंतर्गत महाराष्ट्रातून अधिकाधिक सुवर्णपदके मिळवणे आणि २०३४ पर्यंत फुटबॉल विश्वचषकासाठी तयारीचे लक्ष्य ठेवून ‘प्रोजेक्ट महादेवा’ राबवण्यात येत आहे.या प्रोजेक्टमधून नक्कीच गुणवान खेळाडू मिळतील,अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनातर्फे ‘प्रोजेक्ट महादेवा’ या राज्यस्तरीय क्रीडा उपक्रमाचा शुभारंभ वानखेडे स्टेडियम येथे करण्यात आला. ‘प्रोजेक्ट महादेवा’ हा उपक्रम महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (VSTF), वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA), सिडको (CIDCO) आणि महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग या विविध संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे धोरणात्मक दिशा, तळागाळातील सहभाग, व्यावसायिक फुटबॉल कौशल्य, पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय पाठबळ मिळून राज्यात एक सक्षम आणि शाश्वत फुटबॉल विकास व्यवस्था उभी राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘प्रोजेक्ट महादेवा ‘ हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा उपक्रम आहे, जो संपूर्ण राज्यात तरुण फुटबॉल मधील प्रतिभेचा (१३ वर्षांखालील) शोध घेवून फुटबॉल मधील उच्च दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत शिष्यवृत्ती, परदेशी प्रशिक्षकांकडून जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि सर्वांगीण विकासाची संधी दिली जाणार आहे. निवडलेल्या ६० खेळाडूंची (३० मुले, ३० मुली) पाच वर्षांची संपूर्ण निवासी शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच अव्वल खेळाडू नक्कीच फिफा विश्वचषक मध्ये खेळतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.







