मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी येथील एक प्लॅटफॉर्म तीन महिन्यांसाठी बंद राहणार आहे. १ ऑक्टोबरपासून हा प्लॅटफॉर्म बंद करण्यात येणार आहे. त्याचा परिणाम लांब पल्ल्यांच्या ट्रेनवर होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा १८ नंबरचा प्लॅटफॉर्म पायाभूत कामे आणि सुरक्षा बॅरेकेड्स उभारण्याच्या कामासाठी १ ऑक्टोबरपासून सुमारे ३ महिने बंद राहणार आहे. प्लॅटफॉर्म बंद असल्यामुळं या लोकलला कोणताही फटका बसणार नाहीये. तर लांब पल्ल्याच्या गाड्यांना मात्र फटका बसणार आहे. या प्लॅटफॉर्मवरुन सुटणाऱ्या अमरावती-सीएसएमटी या दोन्ही एक्स्प्रेस गाड्या दादरपर्यंतच धावणार आहेत. सध्या सीएसएमटी येथे प्लॅटफॉर्म ११ ते १८ वर सुमारे २० ते २२ एक्स्प्रेस दररोज धावतात. या ट्रेनसाठी दररोज सुमारे १ लाख प्रवासी रोज पोहोचतात. अशातच तीन महिने हा प्लॅटफॉर्म बंद असल्यामुळं प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्रवाशांना आता ट्रेन पकडण्यासाठी दादर येथे जावे लागणार आहे. सीएसएमटी पुनर्विकास प्रकल्पासाठी २४५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. रेल्वे भूमी विकास प्राधिकरणमार्फत या प्रकल्पाचे काम करण्यात येत आहे. सीएसएमटीच्या सर्व प्लॅटफॉर्मवर विस्तारित डेक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी टप्प्याटप्प्याने सर्व प्लॅटफॉर्मवर पायलिंगचे काम केले जात आहे. यासाठीच १८ नंबरचा प्लॅटफॉर्म बंद करण्यात येत आहे.







