रायगड : ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराच्या अॅप्सपासून लांब राहण्याचं आवाहन आणि जनजागृती सायबर क्राईमच्या वतीने कायमच करण्यात येते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या आधुनिक जगात सर्वात जास्त सायबर हल्ले होताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराच्या अॅप्सच्या माध्यमातून लोकांची आर्थिक फसवणूक करणा-या एका रॅकेटचा पर्दाफाश रायगड सायबर पोलीसांनी केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून तब्बल ४४ म्युल बँक खात्यांमधील तब्बल १९ कोटी ४४ लाखांहून अधिक रक्कमवर पोलीसांनी स्थिगिती आणली आहे.
अलिबाग येथील अमित बापू जाधव (वय ३७) यांना मोबाईलवर वारंवार ऑनलाइन गेमिंग अॅप्सची जाहिरात दिसत होती. कायदेशीर असल्याचा भास झाल्याने त्यांनी AM999, माधुर मटका, PARIMATCH ही अॅप्स डाऊनलोड करून त्यात १०,००० रुपये गुंतवले. मात्र त्यांना कोणताही परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी तपासात २५ पेक्षा जास्त ऑनलाईन गेमिंग अॅप्स उघड केले आहेत. यात AM999, Madhur Matka, PARIMATCH, BETVIBE, Casinodays, Bluechip, 1XBET, Teenpatti, Forex, 4rabet यांसारख्या लोकप्रिय नावांचा समावेश आहे. हे सर्व अॅप्स गुगल प्ले स्टोअरवर सहज उपलब्ध असल्याने अनेकांना ते कायदेशीर वाटत होते.







