वृत्तसंस्था : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला अखेर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यामुळे तब्बल १८ वर्षांनंतर अरुण गवळी (Arun Gawali) जेलमधून बाहेर येणार आहे. मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती आणि तो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता.
जस्टीस एम. एम. सुंदरेश आणि जस्टीस एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने गवळीला जामीन मंजूर करताना दोन प्रमुख बाबी लक्षात घेतल्या. पहिली म्हणजे, गवळीने १७ वर्षे आणि तीन महिन्यांची शिक्षा पूर्ण केली आहे आणि दुसरी, त्याचे वय ७६ वर्षे आहे. सर्वोच्च न्यायालयाने या आधारावर जामीन मंजूर केला असून, निचल्या न्यायालयाने ठरवलेल्या अटी आणि शर्तींचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची अंतिम सुनावणी फेब्रुवारी २०२६ मध्ये होणार आहे.







