रोहित शर्मा व विराट कोहलीशिवाय पहिल्यांदाच भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला असून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताच्या नव्या फळीच्या शिलेदारांचा कस लागण्याची शक्यता आहे. शुबमन गिलकडे कसोटी संघाचं नेतृत्व आहे. भारताच्या यंग ब्रिगेडची कामगिरी कशी होईल, याकडे तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असतानाच या मालिकेत भारताचा हुकमी एक्का म्हणजेच भरवशाचा आणि अनुभवी बुमराह हे मालिकेचं प्रमुख आकर्षण ठरण्याची शक्यात आहे. भारतासह जगभरात बुमराहचे चाहते आहेत. या मालिकेत बुमराहनं नेमकं काय करायला हवं, यासंदर्भात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं त्याला कानमंत्र दिला आहे.
जसप्रीत बुमराह गेल्या काही काळापासून दुखापतींनी ग्रस्त असून त्यामुळे त्याला यादरम्यानच्या काही सामन्यांना मुकावंही लागलं होतं. या पार्श्वभूमीवर नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये बुमराहनं पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं दाखवलं असलं, तरी आयपीएलमधून थेट कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ दाखल झाल्यामुळे बुमराहसह सगळ्यांच्याच कामगिरीकडे लक्ष असेल. अर्थात, बुमराहचा अनुभव या सर्व निकषांच्या पलीकडचा असून त्याच्या याच वलयाचे साक्षीदार होण्यासाठी क्रिकेट चाहत्यांसह आजी-माजी क्रिकेटपटूही उत्सुक आहेत. सचिन तेंडुलकर हे त्यातलंच एक नाव! मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या सविस्तर मुलाखतीमध्ये भारतीय संघाच्या इंग्लंडमधील कामगिरीबाबत आणि यंग ब्रिगेडच्या खेळण्याच्या पद्धतीबाबत सविस्तर भाष्य केलं आहे. मात्र, त्याचवेळी सचिनलाही बुमराहची तेजतर्रार आणि फलंदाजांना बुचकळ्यात टाकणारी गोलंदाजी बघण्याची उत्सुकता आहे. या मुलाखतीमध्ये सचिननं ती व्यक्तदेखील केली असून बुमराहला इंग्लंडमधील खेळपट्ट्या व वातावरणात कशा प्रकारे प्रभावी गोलंदाजी करता येईल, याबाबत कानमंत्र दिला आहे.







