पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यातील अनेक ठिकाणी उघडीप दिल्याचे पाहिला मिळत होते. मात्र, गुरुवारी (दि.१९) पहाटेपासूनच पुण्यासह परिसरात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याचेही दिसून आले आहे. भारतीय हवामान विभागानेही पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, आता हा पाऊस होताना दिसत आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरु आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. कोकण किनारपट्टी आणि पावसाची महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहत आहे. सह्याद्री पर्वत रांगेत मुसळधार पाऊस सुरू असल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस पाऊस होण्याचा अंदाज आहे. काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मुंबई, पुणे आणि कोकण प्रदेशात तीव्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी गरज असल्याचं घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.







