पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची एक कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी टोळीला सायबर पोलिसांनी अटक केली. नगर रस्त्यावरील वाघोली परिसरातील एका बँकेचा संचालकासह तांत्रिक सहायक कर्मचारी या गुन्ह्यात सामील असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आरोपींनी बँक खात्यांचा वापर फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सहाजणांना अटक करण्यात आली आहे. गोविंद संजय सूर्यवंशी (वय २२, रा. वाघोली, नगर रस्ता, मूळ रा. हिंगोली), रोहित सुशील कंबोज (वय २३, रा. वाघोली, नगर रस्ता, मूळ रा. पंजाब), बाबाराव उर्फ ओंकार भवर (वय २२, रा. वाघोली, नगर रस्ता, मूळ रा. हिंगोली), जब्बरसिंह अर्जुनसिंह पुरोहित (वय ४५, रा. चऱ्होली, मूळ रा. धारावी, मुंबई, निखील उर्फ किशोर जगन्नाथ सावंत (वय ३२, रा. वाघोली, नगर रस्ता), केतन उमेश भिवरे (वय २७, रा. खराडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. न्यायालायने आरोपींना १२ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने अनन्या गुप्ता असे नाव सांगणाऱ्या महिलेने एका ज्येष्ठाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाकडून वेळोवेळी एक लाख ६० हजार रुपये घेतले. ज्येष्ठाने आरोपींच्या बँक खात्यात पैसे जमा केले होते. त्यापैकी काही रक्कम वाघोलीतील एका बँक खात्यात जमा झाल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर संबंधित बँकेतील खातेधारक भिवरे याला ताब्यात घेतले. तांत्रिक तपासात आरोपी गोविंद सूर्यवंशी, रोहित कंबोज, ओंकार भवर, जब्बरसिंह पुरोहित यांची नावे निष्पन्न झाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यांना अटक केली.







