नवी दिल्ली : कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) नियुक्त केलेल्या हंगामी समितीने सहा आंदोलक कुस्तीगिरांना आशियाई क्रीडा स्पर्धा आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवडीसाठी विशेष सवलत दिली आहे. त्यांची केवळ एका सामन्याच्या आधारे या स्पर्धासाठी भारतीय संघात निवड केली जाणार आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे मावळते अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाचे आरोप करताना देशातील आघाडीच्या कुस्तीगिरांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलक कुस्तीगिरांपैकी विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, संगीता फोगट, सत्यवर्त कडियन आणि जितेंदर किन्हा यांना आशियाई क्रीडा स्पर्धा व जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीच्या निवड चाचण्यांना मुकण्याची मुभा देण्यात आली आहे. आंदोलक कुस्तीगिरांना या निवड चाचण्यांमधील विजेत्यांविरुद्ध खेळण्याची ५ ते १५ ऑगस्ट या कालावधीत संधी मिळेल. या एका लढतीत विजय मिळवल्यास त्यांचे भारतीय संघातील स्थान निश्चित होईल.
ब्रिजभूषण यांच्याविरोधातील दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनामुळे आपल्याला सरावासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. त्यामुळे आपल्यासाठी ऑगस्टमध्ये निवड चाचणीचे आयोजन केले जावे अशी विनंती आंदोलक कुस्तीगिरांनी क्रीडा मंत्रालयाकडे केली होती. हंगामी समितीला आशियाई क्रीडा स्पर्धासाठीची निवड चाचणी १५ जुलैपूर्वी घेणे बंधनकारक आहे. त्यानंतर भारतीय खेळाडूंची अंतिम यादी आयोजकांना देणे गरजेचे आहे. आधी निवड चाचणीचे आयोजन करून भारतीय ऑलिम्पिक समिती (आयओए) १५ जुलैपूर्वी खेळाडूंची नावे आशिया ऑलिम्पिक समितीला (ओसीए) देऊ शकेल. त्यानंतर आंदोलक कुस्तीगिरांना निवड चाचणीतील विजेत्यांविरोधातील सामना जिंकण्यात यश आल्यास त्यांच्या नावांचा अंतिम यादीत समावेश करता येऊ शकेल. मात्र, त्यामुळे निवड चाचणीत विजयी ठरणाऱ्या खेळाडूंना आशियाई क्रीडा स्पर्धेपासून दूर राहावे लागेल. केवळ एका सामन्याच्या आधारे कुस्तीगिरांची भारतीय संघात निवड करण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ‘‘भारतीय कुस्तीमध्ये आता बदल होत आहेत असे म्हटले जाते. मात्र, त्यात खरेच तथ्य आहे का? आताही पूर्वीप्रमाणेच गोष्टी घडत आहे. काही कुस्तीगिरांना विशेष सवलती मिळत आहेत. आधी कुस्ती महासंघाकडून आणि आता हंगामी समितीकडून काही कुस्तीगिरांना फायदेशीर ठरणारे निर्णय घेतले जात आहेत. या कुस्तीगिरांची केवळ सामन्याच्या आधारे निवड होणार आणि आमच्या मुलांना पूर्ण निवड चाचणी स्पर्धेत खेळावे लागणार, हा अन्याय आहे,’’ अशी भावना एका कुस्तीगिराच्या वडिलांनी व्यक्त केली.