मुंबई : भारतीय पुरुष फुटबॉल संघाने तब्बल पाच वर्षांनंतर इंटरकॉन्टिनेंटल कप जिंकला आहे. भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय फुटबॉल संघाने लेबनॉनचा 2-0 असा पराभव केला. भारतासाठी या सामन्यात कर्णधार सुनील छेत्रीने पहिला गोल केला. त्याच्यानंतर लल्लियांझुआला छांगटेने दुसरा गोल केला.
टीम इंडियाने दुसऱ्यांदा इंटरकॉन्टिनेंटल कपचे विजेतेपद पटकावले असून यापूर्वी 2018 मध्ये भारताने ही स्पर्धा जिंकली होती. इंटरकॉन्टिनेंटल कपचे हे तिसरे वर्ष असून भारत या स्पर्धेत दुसऱ्यांदा चॅम्पियन बनला आहे. इंटरकॉन्टिनेंटल कपच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी सामन्याची जोरदार सुरुवात केली. सुरुवातीच्या 45 मिनिटांमध्ये एकही गोल झाला नाही. लेबनॉन संघाने बरेच प्रयत्न केले परंतु त्यांना भारताची डिफेंस फळी भेदता आली नाही. टीम इंडियाने डिफेंसमध्ये चांगला खेळ केला, पण पहिल्या हाफमध्ये भारताने गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालवल्या. भारतीय संघाने दुसऱ्या हाफची धमाकेदार सुरुवात केली. दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला 46व्या मिनिटाला सुनील छेत्रीने पहिला गोल केला. यापाठोपाठ भारताचा खेळाडू लल्लियांझुआला छांगटेने 61व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी दुप्पट केली. परंतु भारताची ही आघाडी लेबनॉनला भेदता आली नाही आणि अखेर २-० ने आघाडी घेत भारताने लेबनॉनचा पराभव केला. या सामन्यात लल्लियांझुआला छांगटेनेला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.