वृत्तसंस्था : भारताने आयर्लंडविरुद्धची तीन सामन्यांची टी-२० मालिका जिंकली आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात १८६ धावांच्या प्रत्युत्तरात आयर्लंडला केवळ १५२ धावा करता आल्या. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडे आता २-० अशी अभेद्य आघाडी आहे. पहिल्या डावात २१ चेंडूत ३८ धावा करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या रिंकू सिंगला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे. ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकी खेळीनंतर कर्णधार जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांच्या नेतृत्वाखालील प्राणघातक गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने आयर्लंडविरुद्धचा दुसरा टी-२० सामना जिंकला. ३३ धावांनी विजय मिळवून मालिका खिशात घातली. अँड्र्यू बालबर्नीने ७२ (५१) अशी शानदार खेळी खेळली. भारताकडून बुमराह, कृष्णा आणि बिश्नोई यांनी २-२ बळी घेतले. त्याच्याशिवाय संजू सॅमसनने २६ चेंडूत ४० धावा, रिंकू सिंगने २१ चेंडूत ३८ धावा केल्या. तसेच शिवम दुबेने १६ चेंडूत २२ धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला.
आयर्लंडकडून बॅरी मॅकार्थीने चार षटकांत ३६ धावांत दोन बळी घेतले. तर मार्क एडर, क्रेग यंग आणि बेंजामिन व्हाईट यांना प्रत्येकी एक यश मिळाले. या मालिकेतील शेवटचा सामना २३ ऑगस्ट रोजी होणार आहे. हा सामना आता केवळ औपचारिकता राहील. कारण ३३ धावांनी विजय मिळवून युवा भारतीय संघाचा आत्मविश्वास सातव्या गगनावर आहे.