नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेत मोठा बदल करण्यात येणार होता. या मालिकेला उशिराने सुरुवात होणार होती. त्यामुळए सर्वांचे लक्ष हे या मालिकेत नेमका कोणता बदल होतो, याकडे लागले होते. पण आता या मालिकेबाबत मोठे अपडे्टस समोर आले आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेच्या कार्यक्रमात कोणताही बदल होणार नाही, असे भारतीय क्रिकेट बोर्डाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मूळ कार्यक्रमानुसार दोन कसोटींची ही मालिका १२ जुलैपासूनच सुरू होईल. वर्ल्ड कप वन-डे क्रिकेट पात्रता स्पर्धेतील सांगता लढत ९ जुलैस होणार आहे. वेस्ट इंडिजच्या कसोटी संघातील चार खेळाडू सध्या सुरू असलेल्या या पात्रता स्पर्धेत खेळत आहेत. मात्र, कार्यक्रमात कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही, असे विंडिज क्रिकेट बोर्डाने भारतीय क्रिकेट बोर्डास कळवले आहे. ठरल्यानुसार या दौऱ्याची सांगता फ्लोरिडा (अमेरिका) येथे होणाऱ्या टी-२० लढतीनेच होणार आहे.
मालिकेच्या कार्यक्रमात कोणताही बदल झालेला नाही. चार खेळाडूंच्या सहभागाचा प्रश्न विंडीज बोर्डासमोर आहे. मात्र, हा प्रश्न फारसा गंभीर नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर आवश्यकता भासल्यास दौऱ्याच्या कार्यक्रमात ऐनवेळी माफक बदल सहज होऊ शकतो, असे भारतीय क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. जेसन होल्डर, काइल मेयर्स, रॉस्टन चेस, अल्झारी जोसेफ हे कसोटीपटू वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत खेळत आहेत. या पात्रता स्पर्धेतील दोन संघ मुख्य स्पर्धेस पात्र ठरणार आहेत. त्यामुळे स्पर्धेच्या अंतिम सामन्याला काहीही अर्थ नाही, अशी विंडीज क्रिकेट बोर्डाची भूमिका आहे.
बार्बाडोसला भारतीय क्रिकेट संघ तीन विविध गटातून येणार आहे. पहिली कसोटी १२ जुलैस, तर दुसरी २० जुलैपासून आहे. त्यानंतर तीन सामन्यांची वन-डे मालिका होईल. यातील लढती २७ जुलै, २९ जुलै आणि १ ऑगस्टला होतील. कसोटी सामन्यांचे प्रक्षेपण संध्याकाळी ७.३० पासून, तर वन-डे लढतीचे प्रक्षेपण संध्याकाळी ७पासून होईल.