मुंबई : भारताला गेल्या १० वर्षांत एकही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही. पण भारतीय संघाला मोठी स्पर्धा आतापर्यंत का जिंकता आलेली नाही, याबाबत आता भारताचा सर्वात अनुभवी खेळाडू आर. अश्विनने एक कटू सत्य सांगितले आहे. कोणत्या एका गोष्टीमुळे भारतीय संघ मोठी स्पर्धा जिंकत नाही, याबाबतची पोलखोल आता अश्विनने केली आहे. भारताने इंग्लंडमध्ये १० वर्षांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती, त्यानंतर भारताला एकही आयसीसीची स्पर्धा जिंकता आलेली नाही. गेल्या दोन्ही वर्षांत भारतीय संघ विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. दोन्ही फायनलमध्ये संघाचा कर्णधार बदलला, प्रशिक्षक बदलले पण तरीही भारताला एकदाही जेतेपद पटकावता आले नाही. त्यामुळे भारतीय संघ आयसीसीच्या स्पर्धेत गेल्या १० वर्षांमध्ये का जिंकू शकला नाही, याबाबत आता अश्विनने एक मोठे विधान केले आहे.
अश्विनने सांगितले की, ” भारतीय संघात आता मोठे बदल झाले आहेत, पूर्वीसारखा भारतीय संघ आता राहीलेला नाही. कारण पूर्वी भारतीय संघात बरेच मित्र होते, पण आता फक्त एकच मित्र आहे. भारतीय संघातील सर्वच खेळाडूंना पुढे जायचे आहे, त्यांना प्रसिद्धी मिळवायची आहे. आपला खेळ कसा चांगला होईल, हे त्यांना पाहायचे असते. पण जेव्हा तुम्ही एक संघ म्हणून खेळत असता तेव्हा संघाचा विचार प्रथम करायचा असतो. प्रत्येक खेळाडूच्या गुणवत्तेचा विकास संघात होईलच असे नाही. पण संघाचा विकास मात्र नक्कीच व्हायला हवा आणि त्यासाठी संघातील खेळाडूंची मानसीकता महत्वाची असते. पण इथे एकाही खेळाडूला दुसऱ्यासाठी वेळ नाही. कारण ते त्यांच्याच गोष्टीत जास्त रमतात आणि त्यांचाच विचार करतात. त्यामुळे या संघात सर्व सहकारी असले तरी मित्र म्हणून जास्त कोणीही नाही.” कोणताही संघ हा टीम स्पिरीटच्या जोरावर जिंकत असतो, संघाचा प्रथम विचार जे करतात त्यांनाच जेतेपद मिळवता येते आणि हीच गोष्ट अश्विनने सांगितली आहे. अश्विनने यावेळी एका मोठ्या विषयाला हात घालताना भारतीय संघातील कटू सत्य सर्वांसमोर आणले आहे.