वृत्तसंस्था : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान केलेल्या गैरवर्तणुकीमुळे दोन सामन्यांच्या बंदीची कारवाई करण्यात आली. हरमनप्रीत बाद झाल्यावर तिने आपला राग स्टम्पवर काढला आणि त्यानंतर सामनाधिकाऱ्यांवर टीका केली. ‘‘हरमनप्रीत कौरला ‘आयसीसी’च्या आचारसंहितेच्या दोन उल्लंघनासाठी पुढील दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांकरता बंदी घालण्यात आली आहे,’’ असे ‘आयसीसी’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे. या कारवाईनंतर हरमनप्रीत सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दोन सामन्यांत खेळू शकणार नाही. हरमनप्रीतला नाहिदा अक्तेरच्या चेंडूवर पायचीत बाद देण्यात आले होते. मात्र, तिने चेंडू बॅटच्या खालच्या भागाला लागला असल्याचे म्हटले. माघारी जाताना तिने स्टम्पवर राग काढला. पुरस्कार वितरण सोहळय़ातही तिने पंचांवर टीका केली आणि पंचांनीही दोन्ही संघांसह या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे सांगितले. तिच्या या गैरवर्तणुकीनंतर बांगलादेशची कर्णधार निगार सुल्ताना आपल्या संघासह तेथून निघून गेली.
पंचांच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी हरमनप्रीतच्या सामन्यातील मानधनाची ५० टक्के रक्कम दंड म्हणून आकारण्यात येणार आहे. हा दुसऱ्या स्तरावरील अपराध आहे याशिवाय पंचांवर करण्यात आलेली टीका हा पहिल्या स्तरावरील अपराध असून सामन्यातील २५ टक्के रक्कम दंड म्हणून आकरण्यात येणार आहे. भारतीय कर्णधाराने आपली चूक मान्य केली असून कारवाई स्वीकारली आहे. याबाबतची सूचना ‘आयसीसी’च्या आंतरराष्ट्रीय पॅनलमधील पंच अख्तर अहमद यांनी केली होती. हरमनप्रीतने चूक मान्य केल्याने पुढील सुनावणीची आवश्यकता पडली नाही.
दुसऱ्या स्तरावरील अपराधाकरता खेळाडूंना सामन्यातील मानधनाचा ५० ते १०० टक्के दंड आणि त्याच्या नावे तीन ‘डिमेरीट‘ गुण जोडले जातात. पहिल्या स्तरावरील अपराधाकरता सुरुवातीला समज दिली जाते. त्यापुढील कारवाईची गरज भासल्यास सामन्याच्या मानधनातील ५० टक्के रक्कम दंड म्हणून आकारली जाते तसेच, एक किंवा दोन ‘डिमेरीट’ गुण खेळाडूच्या नावे जमा होता. ‘‘हरमनप्रीतच्या प्रकरणात चार ‘डिमेरिट’ गुण म्हणजे दोन निलंबन अंक होतात. अशा वेळी खेळाडू एक कसोटी सामना किंवा दोन एकदिवसीय किंवा दोन ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी बंदी घातली जाऊ शकते,’’ असे ‘आयसीसी’ने म्हटले आहे.