लंडन : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या ७ जून पासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच सुरु होणार आहे. लंडन येथे ही स्पर्धा खेळवली जाणार असून ही मॅच सुरु होण्याआधीच टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याला दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.
७ जून ते ११ जून या दरम्यान लंडन येथे केन्सिंग्टन ओव्हल या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्टेडियमवर स्पर्धेची फायनल मॅच खेळवली जाणार आहे. दुपारी ३ वाजल्यापासून ही मॅच खेळवली जाणार असून यास्पर्धेसाठी भारतीय संघ लंडन येथे पोहोचला आहे. परंतु मॅचच्या आदल्या दिवशी प्रॅक्टिस करत असताना भारताचा कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
बॅटिंग प्रॅक्टिस करत असताना रोहित शर्माच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. यानंतर तो मैदानातून बाहेर पडला. पण आता त्याला झालेली दुखापत ही फार गंभीर नसल्याची माहिती मिळत आहे. दुखापत झाल्यानंतर मैदानाबाहेर पडलेल्या रोहित शर्माने काहीकाळ विश्रांती घेऊन पुन्हा प्रॅक्टिस करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे उद्या पासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये रोहित शर्मा खेळताना दिसले अशी अपेक्षा आहे.