मुंबई : सत्यपाल मलिक हे भाजपच्या विचारांचे होते. जम्मू कश्मिरमध्ये असणाऱ्या राज्यपाल मलिक यांची नियुक्ती भाजपने केली होती. पुलवामामध्ये जवानाची हत्या कशामुळे झाली. जवानांना हवं ते साधन न मिळाल्याने त्याचा जीव गेला, असं मलिकांनी सांगितलं. त्यांनी देशाच्या वरिष्ठांना हे सांगितलं. पण त्यांना न बोलण्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे अशा सरकारला सत्तेवर बसण्याचा कोणताही अधिकार नाही, असं म्हणत शरद पवार यांनी रोखठोक मत व्यक्त केलं आहे.
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ‘व्यक्तीगत निर्णय’ घेतील आणि भाजपसोबत जातील, अशी चर्चा सुरू आहे. अजित पवार वेगळा विचार करत भाजपमध्ये जातील असं वाटत नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तर अजित पवार आल्यास महायुती भक्कम होईल, असं वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केलंय. त्यामुळे आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडणार का? असा सवाल उपस्थित होताना दिसतोय. सर्व समीकरण जुळत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट केंद्र सरकारवर आगपाखड केली आहे. जम्मु काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपावरून एकीकडे रान पेटलं असताना शरद पवारांनी याच मुद्द्यावर धरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलंय.
अजित पवार कालच महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत होते. मात्र एका कार्यक्रमाला आले नाहीत म्हणून लगेच चर्चा करण्यात अर्थ नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा श्वास घेतलाय. राज्याच्या राजकारणात अस्थिरता दिसत असताना आता राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. अजित पवार लवकरच एकनाथ शिंदे यांची जागा घेणार असल्याची शक्यता व्यक्त केली जातीये. तर शरद पवार आणि कुटुंबियांवर मोदी सरकार दबाव टाकत असल्याचं संजय राऊत यांनी सामन्याच्या रोखठोकमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे अजित पवार पुन्हा पहाटेची साखरझोप मोडणार की काय? अशी शंका उपस्थित होत आहे.