पिंपरी : ‘एका विचाराने शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती झालेली आहे. बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या संकल्पनेतून ही युती पुढे आली आहे. एखाद्या जाहिरातीमुळे युतीवर काही परिणाम होईल, एवढी युती कच्ची नाही,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. ‘आम्ही मजबूत असून सरकारची काही काळजी करू नका,’ असेही त्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनांचे वाटप झाले. या वेळी ते बोलत होते. थेरगाव येथे झालेल्या या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी आमदार संजय भेगडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त राहुल महिवाल, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘मी आणि देवेंद्र फडणवीस चांगले काम करीत आहोत. धाडसी निर्णय घेणारे हे धाडसी सरकार आहे. करोना काळातील सर्व निर्बंध उठवले. जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायचे हेच माझे आणि सरकारचे एकच काम आहे. आमचे सरकार खोटे काम करणारे नाही. खोटी आश्वासने देत नाही.’
लोकप्रतिनधी व प्रशासन एका रथाची दोन चाके आहेत. प्रशासनाने लोकप्रतिनिधींचे ऐकले पाहिजे. ते लाखो लोकांतून निवडून येतात. अधिकाऱ्यांनी ‘इगो’ ठेवू नये. दोघांनी मिळून काम केले पाहिजे. आतापर्यंत राज्यात ३५ लाख नागरिकांपर्यंत सरकार पोहोचले आहे. १०४ शिबिरांच्या माध्यमातून २८६ कोटी रुपयांचा लाभ नागरिकांना देण्यात आला आहे‘विद्यमान राज्य सरकार वेगवान असून, २४ बाय ७ अॅक्शन मोडमध्ये काम करणारे आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेने निगडी येथे उभारलेल्या महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, अण्णा बनसोडे, ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे आदी या वेळी उपस्थित होते.
महात्मा बसवेश्वर महाराजांच्या कार्याचा गौरव करून मुख्यमंत्री म्हणाले, ‘समता, बंधुता तत्त्वांशी तडजोड न करता बसवेश्वर महाराजांनी लौकिक निर्माण केला. ते प्रेरणा आणि ऊर्जास्थळ आहेत. त्यांनी बाराव्या शतकातच संसदीय लोकशाहीचा पाया घातला. श्रम हीच पूजा मानून श्रमाधारित व्यवस्था निर्माण केली. त्यामुळे लंडनमध्येही त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.’ ‘रखडलेल्या राज्यातील प्रकल्पांना गती देण्याचे काम आमचे सरकार करीत आहे. नागरिकांसाठी नियमांमध्ये बदल केले असून, अधिकारी वर्गही काम करण्यासाठी धावू लागला आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना देशात अनेक चांगल्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले. पुतळा समितीचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांनी मनोगत व्यक्त केले. शिल्पकार पंकज तांबे आणि वास्तुविशारद सचिन शहा यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक आयुक्त शेखर सिंह यांनी केले. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी आभार मानले. संदीप साकोरे आणि भाऊसाहेब कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. ‘मी रस्त्यावर फिरणारा मुख्यमंत्री आहे. मुंबईत नालेसफाई झाली की नाही, हे मी अगदी जागेवर जाऊन पाहिले. राज्यात कुठेही गाडी थांबवून मी प्रत्येकाला भेटतो. आजवर जगामध्ये असा मुख्यमंत्री तुम्ही कधी पहिला आहे का, मला इगो नाही, मी रस्त्यावरील कार्यकर्ता आहे,’ असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला.पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून, महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामांसाठीचा ४६० कोटी रुपयांचा शास्तीकर माफ केला. याशिवाय २०१८ ते २०२३ पर्यंतचे विकास आणि बांधकामाचे अतिरिक्त विकास शुल्कही १०० टक्के माफ केले असून, एप्रिल २०२३ पासून क्षेत्रनिहाय तपासून आकारणी करण्याचा निर्णय घेतला. मोशी येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी अडीच एकर जागा देणे, प्राधिकरण बाधित झालेल्या भूमिपुत्रांचा प्रश्न सोडविण्याची भूमिका आम्ही घेतली असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथे उभारण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.