नवी दिल्ली : नवीन संसद भवन उद्घाटनानंतर आता देशात लोकसभेच्या जागा वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. २०२६ मध्ये देशात सीमांकन होणार आहे, त्यामुळे देशातील लोकसभेच्या सध्याच्या ५४३ जागा वाढून १ हजार २१० होणार असल्याचं सांगण्यात येतं आहे. सध्याच्या लोकसंख्येचा विचार करता नव्या सीमांकनानंतर लोकसभा मतदारसंघाची संख्या वाढेल, त्यामुळे सध्या महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा असून त्यांची संख्या ८२ वर पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यापूर्वी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह आणि भाजपचे राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनीही नवीन सीमांकनाबाबत उल्लेख केला आहे. सध्या देशाची लोकसंख्या ही १४२ कोटींवर पोहोचल्याचा अंदाज असून १० लाख लोकसंख्येमागे एक लोकसभेची जागा असा फॉर्म्युला ठरल्यास लोकसंख्येप्रमाणे देशात १ हजार २१० मतदारसंघ होतील, पण नव्या संसद भवनामध्ये ८८८ खासदार बसू शकतील एवढीच व्यवस्था आहे, त्यामुळे ८८८ मतदारसंघ तयार करायचे झाल्यास, १६ लाख लोकसंख्येमाग एक मतदारसंघाचं समीकरण ठेवावं लागेल. १९५२ साली देशात पहिलं सीमांकन झालं तेव्हा ४९४ लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आले, त्यानंतर १९६३ साली दुसरं सीमांकन करण्यात आलं आणि ५२२ मतदारसंघ केले गेले. १९७१ ला तिसरं सीमांकन झालं त्यात ५४३ लोकसभा मतदारसंघ झाले. २०२२ मध्ये सीमंकनानंतरही जागा वाढल्या नाहीत, यानंतर आता २०२६ मध्ये सीमांकन होणार आहे.