पुणे : सहकारनगर भागात वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. आतापर्यंत पोलीस आयुक्तांच्या आदेशाने शहरातील ३६ गुंड टोळ्यांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
टोळीप्रमुख सिद्धार्थ विजय गायकवाड (वय २२), राम राजाभाऊ उमाप (वय २३), सनी उर्फ किरण कैलास परदेशी (वय २७), अमोल उर्फ नाना जालिंदर बनसोडे (वय ३१), समीर रज्जाक शेख (वय २३), राजाभाऊ उर्फ जटाळ्या लक्ष्मण उमाप (वय ५०), गणेश कैलास परदेशी (वय ३०), नरेश सचिन दिवटे (वय २६), हर्षद अप्पा ढेरे (वय २२), शुभम अनिल ताकतोडे (वय १९), विशाल शिवाजी पाटोळे (वय १९), चेतन महादेव कांबळे (वय २६), गौरव अरविंद नाईकनवरे (वय २२) अशी कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत. गायकवाड आणि साथीदारांनी सहकारनगर, भारती विद्यापीठ, स्वारगेट, दत्तवाडी, कोंढवा, मार्केट यार्ड, बिबवेवाडी भागात १४ गंभीर गुन्हे केले आहेत. या टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. सहकारनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडे पाठविला होता. मोक्का कारवाई प्रस्तावाची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी गायकवाड टोळीविरुद्ध मोक्का कारवाईचे आदेश दिले.