पुणे : पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या पाच कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील खासगी कंपनीच्या भट्टीत अमली पदार्थ जाळण्यात आले. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने, तसेच विविध पोलीस ठाण्यातील पथकांनी चार कोटी ७५ लाख ५३ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते. अमली पदार्थ नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले होते. पोलिसांनी ६७ लाख ७८ हजार रुपये किंमतीचा गांजा, एक कोटी ९७ लाख १७ हजार रुपयांचा एक किलो ११४ ग्रॅम मेफेड्रोन, दोन कोटी १३ लाख ९४ हजार रुपयांचे एक किलो ४२६ ग्रॅम कोकेन, १९ लाख ६६ हजार रुपये चरस, दोन लाख ८७ हजार रुपयांचा अफूच्या बोंडांचा चुरा, चार लाख नऊ हजार रुपयांचे हेराॅईन असा अमली पदार्थांचा साठा नष्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली मुद्देमाल नाश समितीचे अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, रोहिदास पवार,रासायनिक विश्लेषक जि. भ. सदाकाळ, न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे क्षेत्र अधिकारी प्र. अ. लेंडे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रमोद डोके, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विठ्ठल बोबडे, एस. के. कोल्हे, पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, सुनील थोपटे आदींनी ही कारवाई केली.