पुणे : ससून रुग्णालयात उपचारा घेणारा कैदी, अमली पदार्थ तस्कर ललित पाटील सोमवारी रात्री ससून रुग्णालयातून पसार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ शनिवारी दोन कोटी १४ लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ललित पाटील याच्यासह दोनजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. ललित पाटील याच्यासह सुभाष जानकी मंडल (वय २९, रा. देहूरोड, मूळ झारखंड ) आणि रौफ रहिम शेख (वय १९, रा. ताडीवाला रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाटील याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याने त्याला रुग्णालयातून सोडल्यानंतर अटक करण्यात येणार होती. मात्र सोमवारी रात्री दहाच्या सुमारास ससून रुग्णलायातील वाॅर्ड क्रमांक १६ मधून ललित पाटील बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांना गुंगारा देऊन पसार झाला. पाटील पसार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पाटील याला चाकण परिसरात मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी चाकण परिसरात अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो येरवडा कारागृहात येरवडा कारागृहात होता. आजारी असल्याचे सांगून जून २०२३ मध्ये तो ससून रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक १६ मध्ये उपचारासाठी दाखल झाला होता. ससून रुग्णालयात उपचार घेणारा कैदी ललित पाटील याला चाकण परिसरात २०२० मध्ये अमली पदार्थ विक्री प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून १६ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. पाटील स्वत: मेफेड्रोन तयार करत असल्याची माहिती पोेलिसांनी न्यायालयात दिली. ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर पोलिसांनी अमली पदार्थ बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून दोन कोटी १४ लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले.
मंडल आणि शेख यांना अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना चार दिवस पोलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पाटील याच्याकडून २०२० मध्ये चाकण येथे १६ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. पाटील न्यायालयीन कोठडीत आहे. ४ जून २०२३ पासून तो आजारी असल्याने ससून रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक १६ येथे उपचार घेत आहे. पाटीलने अमली पदार्थाची कोणाला विक्री केली आहे का? सुभाष मंडल आणि रौफ शेख यांनी मेफेड्रोन व्यतिरिक्त अन्य कोणत्या अमली पदार्थांचा साठा करून ठेवला आहे का? आरोपी शेख गेल्या ६ वर्षांपासून ससून रुग्णालयातील उपाहारगृहात कामाला आहे. त्याने पाटीलच्या मदतीने अमली पदार्थांची विक्री केली का? तसेच, ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पाटीलने आणखी काही गैरप्रकार केले का, यादृष्टीने तपास करायचा असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयाकडे केली.