पुणे : रेल्वे स्टेशनवर आता एखादा रेकॉर्डवरील आरोपी फिरत असल्यास त्याची माहिती तत्काळ समजणार आहे. मध्य रेल्वेकडून ११७ रेल्वे स्थानकांवर चेहरा ओळखण्याची प्रणाली असलेले साडेतीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे निर्भया फंडातून बसविण्यात येणार आहेत. त्यामध्ये पुणे रेल्वे स्टेशनवर १२० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणे स्टेशनच्या कानाकोपऱ्यावर या कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. पुणे रेल्वे स्टेशन मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्टेशन आहे. येथून दिवसाला १२०पेक्षा जास्त गाड्या धावतात. त्यामधून सव्वा लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे चोरी, लुटमारीसह इतर गंभीर गुन्हे घडले आहेत. पुणे रेल्वे स्टेशनवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सध्या ६० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला गेला. पण, सध्या या कॅमेऱ्यांची कालमर्यादा संपली आहे; तसेच पुणे स्टेशनवर आणली कॅमेऱ्यांची आवश्यकता होती. मध्य रेल्वेच्या वतीने निर्भया फंडातून सर्व रेल्वे स्टेशनवर अत्याधुनिक असे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्यातून पुणे रेल्वे स्टेशनवर नव्याने ६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. जुने ६० सीसीटीव्ही कॅमेरे बदलून त्या ठिकाणी नवीन कॅमेरे बसविले जातील. अशा पद्धतीने १२० सीसीटीव्ही कॅमेरे मार्च २०२४अखेरपर्यंत बसविण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे.
पुणे रेल्वे स्टेशन येथे बसविण्यात येणाऱ्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ‘फेस रेकग्निशन सिस्टिम’ असणार आहे. या कॅमेऱ्यांमधून गोळा केलेला डेटा आयपी नेटवर्कद्वारे मॉनिटरिंग स्टेशनवर पाठविला जातो. या कॅमेऱ्याच्या डेटाबेसमध्ये ज्याचा चेहरा संग्रहित केला आहे, ती व्यक्ती ओळखू शकतात. स्थानकात प्रवेश करताच ओळखीच्या गुन्हेगारांच्या उपस्थितीबद्दल प्रशासनाला ताबडतोब सूचना देतात. हे कॅमेरे चेहऱ्याचे विविध भाग जसे की डोळ्यातील पडदा किंवा कपाळ ओळखू शकतात. गोळा केलेला डेटा ३० दिवसांसाठी संग्रहित केला जाईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. पुणे विभागातील २० रेल्वे स्टेशनवर ७३३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यापैकी पुणे व मिरज येथील कॅमेरे बसविण्यास सुरुवात झाली आहे. चिंचवड स्टेशन येथे ४५, शिवाजीनगर २६, तळेगाव ४४ असे सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. सातारा ४५, सांगली ४४, कराड ४४ आणि कोल्हापूर येथे ४० सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ९५ पीटीझेड सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. पुणे रेल्वे स्टेशनवर सध्या असलेले ६० कॅमेरे बदलून नवीन ६० कॅमेरे बसविण्यात येतील. याशिवाय नवीन ६० कॅमेरेही बसवले जातील. एकूण १२० कॅमेरे असतील. सर्व कॅमेरे आयपी टेक्नॉलॉजीचे असल्याने प्रवाशांची सुरक्षा वाढविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. हे कॅमेरे बसविण्यास सुरुवात झाली आहे.
मध्य रेल्वेकडून बसवले जाणारे कॅमेरे
३,६५२
पुणे रेल्वे विभागात बसविलेले जाणारे कॅमेरे
७३३
पुणे रेल्वे स्टेशनवर बसविले जाणारे कॅमेरे
१२०