मुंबई : दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वेची वाहतूक काही ठिकाणी खंडित झाली होती ,तर काही ठिकाणी संथपणे सुरू होती. अशावेळी कार्यालयातून अथवा आपल्या कामधंद्यावरून घरी निघालेल्या मुंबईच्या चाकरमानांना लवकरात लवकर सुरक्षित घरी पोहोचता यावे, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. एकनाथ शिंदे यांनी एसटीला मुख्य रेल्वे स्थानकाजवळ आपल्या बसेस तैनात करण्यास सांगितले. तसेच त्या बसेस द्वारे रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांची मोफत सोय करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार एसटीच्या मुंबई आणि ठाणे विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण इत्यादी महत्त्वाच्या रेल्वेस्थानकावर आपल्या १०० पेक्षा जास्त बसेस लावून तेथून प्रवाशांची त्यांच्या निवासी क्षेत्रा पर्यंत मोफत वाहतूक करण्याचे नियोजन केले आहे. मुसळधार पावसामुळे आधी लोकल आणि त्यानंतर रस्ते वाहतूक कोलमडल्याने बुधवारी प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. मुंबई आणि उपनगराला जोडणाऱ्या मुक्त मार्ग, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. शहरातील रस्त्यावर देखील पाणी साचल्याने मुंबईकरांचा वेग मंदावला होता.
मुंबई महानगर क्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावली. शहरात कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी बरसत होत्या. त्यामुळे नेहमीप्रमाणे कामासाठी घराबाहेर पडले ते कार्यालयात पोहोचले मात्र दुपारच्या सत्रात कार्यालय सुरू होणाऱ्या नोकरदारांचा पावसामुळे पुरता खोळंबा झाला होता. लोकल विलंबाने धावत होत्या. यामुळे काही प्रवाशांनी रस्ते मार्गे प्रवास करून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट, वांद्रे कुर्ला संकुल येथील कार्यालय गाठण्याचा निर्णय घेतला. मात्र पावसामुळे कमी झालेली दृश्यमानता आणि वाहतूक कोंडी यांमुळे मुक्त मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या वडाळा बाहेर पडणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती, असे वीरेंद्र सिंग यांनी सांगितले. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने कार्यालयात पोहोचण्यास अनेकांना उशीर झाला होता.