मुंबई : भारतीय हवामान खात्याने मुंबई आणि आसपासच्या परिसराला पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. मागील आठवडाभरापासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाने धुवांधार बॅटिंग केली. पावसाने काही उसंत घेतली असतानाच, सकाळपासून मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या रेड अलर्टनंतर मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सकाळपासूनच मुंबईच्या अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली या परिसरात पावसाचा जोर वाढला असल्याचे देखील चित्र पाहायला मिळत आहे.
शहरातील अनेक भागात पाणी तुंबण्याची स्थिती कायम आहे. दरम्यान, हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडू शकतो. त्याच वेळी, इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने काळजी घेण्याते आवाहन केले आहे. अंधेरी सबवेवर पाणी साचले आहे. चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरात देखील पाणी साचलं आहे. यामुळे वाहतूक कोंडी देखील होत आहे. मुंबईत जनजीवन विस्कळीत झाले आहे. वसईमधील सनसिटी रस्ता देखील पाण्याखाली गेला आहे. १० दिवसांपासून रस्ता पाण्याखाली गेला आहे. मात्र पाणी ओसरत नाही आहे. हा रस्ता पोलिसांनी बंद केला आहे. मात्र तरी देखील लोक रस्त्यावरुन वाहने चालवत आहे.