मुंबई : पश्चिम द्रूतगती मार्गावरुन जाणाऱ्या वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई महापालिकेच्या पूल विभागाने माहीममधील सेनापती बापट मार्गावरील फिशरमन कॉलनी ते वांद्रे पूर्वपर्यंत पूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याकरीता दोन दिवसांपूर्वीच निविदा काढण्यात आली असून, पावसाळ्याचा कालावधी वगळता दोन वर्षांत पुलाची उभारणी केली जाणार आहे.
मुंबईतील वाहनसंख्या ही ४३ लाखांपेक्षा अधिक असून मुंबईतील चारही आरटीओंमध्ये ७०० हून अधिक नवीन वाहनांची रोज भर पडत आहे. वाढत्या वाहनसंख्येमुळे पश्चिम द्रुतगती मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग, फ्री वे सह अन्य मार्गावर वाहतूक कोंडी होते. पश्चिम द्रूतगती मार्गावर वाहतूककोंडीचा मोठा सामना वाहनचालकांना करावा लागतो. यामध्ये वांद्रे पूर्व मिठी खाडीजवळून ते माहिम सेनापती बापट मार्गापर्यंत कधीकधी वाहनांच्या रांगा लागतात. त्याचा परिणाम दादर आणि खार, सांताक्रूझपर्यंत जाणवतो. ही कोंडी फोडण्यासाठी माहीममधील सेनापती बापट मार्गावरील फिशरमन कॉलनी ते वांद्रे पूर्व इथपर्यंत उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. हा उड्डाणपूल वांद्रे पूर्व भागातील कलानगर फ्लायओव्हरच्या जवळून सुरू होईल आणि मिठी खाडीवरून सेनापती बापट मार्गाला जोडला जाईल. त्यामुळे उपनगर ते दक्षिण मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. या उड्डाणपुलासाठी २२० कोटी १७ लाख ४० हजार रुपये खर्च येणार आहे. काम पूर्ण करण्याासठी कंत्राटादाराची नियुक्ती केली जाणार असून, त्यासाठी निविदा काढल्याची माहिती मुंबई पालिकेच्या पूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. २०२२ मध्येही या उड्डाणपुलासाठी निविदा काढण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक मुद्दे उपस्थित झाल्याने निविदा प्रक्रिया मागे घेण्यात आली. मिठी खाडीवरून पूल जाणार असल्याने सीआरझेड, वन विभागाची परवानगीही लागणार आहे. ही परवानगी घेण्याची जबाबदारी कंत्राटदारावर असणार आहे.
माहीम कॉजवेवरील वाहतूककोंडी फुटतानाच एस.व्ही. रोड, सी लिंक आणि पश्चिम द्रूतगती मार्गाकडेही वाहनचालकांना जाता येणार आहे. यामुळे पश्चिम द्रूतगती मार्गावरील वाहनांचा प्रवास जलद होण्यास मदत मिळणार आहे. साधारण एक ते सव्वा किलोमीटर लांबीचा हा पूल असेल. सध्या या पट्ट्यात चुनाभट्टी ते बीकेसी आणि जुना कलानगर उड्डाणपूलही आहे. त्यातच माहीम ते वांद्रे पूर्व जवळही उड्डाणपूल उभारणी होणार असल्याने या पट्ट्यातील वाहतूककोंडी भविष्यात कमी होण्यास मदत मिळणार आहे. पश्चिम द्रूतगती मार्गावरील या उड्डाणपुलासाठी याआधी दोन वेळा निविदा काढण्यात आली. त्याला प्रतिसादच न मिळाल्याने मुंबई पालिकेच्या पूल विभागाने पुलाच्या कामासाठी तिसऱ्यांदा निविदा काढली आहे. पुलाच्या कामात माहीम कॉजवे येथील मच्छीमारांची साधारण १९ बांधकामे येत आहेत. त्यामुळे या पुलाच्या कामाला स्थानिक मच्छीमारांचा विरोध होत आहे.