मुंबई : बिपर्जय चक्रीवादळाचा मुंबईला थेट फटका बसला नसला तरी समुद्र प्रचंड खवळलेला आहे. मुंबईत जोराचा वारा सुरू असून सोमवारी जुहू चौपाटीवर चौघे बुडाले. या पार्श्वभूमीवर मुंबईतील समुद्रकिनारे, चौपाट्यांवर पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनांनंतर सर्व किनाऱ्यांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून येथे येणाऱ्या प्रत्येकाला पुन्हा मागे धाडण्याचे काम पोलिस करीत आहेत. चक्रीवादळाचा प्रभाव १५ जूनपर्यंत जाणवणार असल्याने तोपर्यंत ही बंदी कायम ठेवण्यात येणार आहे.मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. वातावरण सुखद झाले असतानाच मुंबईकर समुद्रकिनारी, चौपाट्या यावर गर्दी करीत आहेत. शाळा सुरू होण्यासाठी अद्यापही दोन दिवस शिल्लक असल्याने पर्यटकांचाही तितकाच ओघ सुरू आहे. असे असतानाच बिपर्जय वादळाचा परिणाम मुंबईच्या वातावरणावर जाणवत आहे.
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. वातावरण सुखद झाले असतानाच मुंबईकर समुद्रकिनारी, चौपाट्या यावर गर्दी करीत आहेत. शाळा सुरू होण्यासाठी अद्यापही दोन दिवस शिल्लक असल्याने पर्यटकांचाही तितकाच ओघ सुरू आहे. असे असतानाच बिपर्जय वादळाचा परिणाम मुंबईच्या वातावरणावर जाणवत आहे.
रविवारपासून मुंबईतल्या वाऱ्याचा वेग वाढला असून समुद्रालाही उधाण आले आहे. समुद्रकिनारी उंचच उंच लाटा उसळत आहेत. त्यातच जुहू समुद्रकिनारी चार मुलांचा बुडून मृत्यू झाला. हे सर्व लक्षात घेऊन अशा दुर्घटना टाळण्यासाठी समुद्रकिनारी आणि चौपाट्यांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू, मढ यासारख्या प्रमुख चौपाट्यांसह मुंबईत सर्व चौपाट्या तसेच मरिन ड्राइव्ह, वरळी सीफेस, वांद्रे बँड स्टँड यासारख्या समुद्रकिनारी सोमवारी सायंकाळपासूनच पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. समुद्रकिनारी, चौपाट्यांवर येणाऱ्यांना समुद्रांपासून दूर रोखले जात आहे. पोलिसांची किनाऱ्यावरील गस्त वाढविण्यात आली असून स्पीकरच्या माध्यमातून उद्घोषणा करून पोलिस मुंबईकर तसेच पर्यटकांना न जाण्याचे आवाहन करीत आहेत. चक्रीवादळामुळे समुद्रकिनारी जाणे धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. उन्हाळी सुट्ट्या संपल्या असून अनेक शाळा सुरू झाल्या आहेत. तर काही शाळा १५ जूनपासून सुरू होणार आहेत. असे असले तरी मुंबईत पर्यटकांचा ओघ सुरूच असून गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या परिसरांत अधिक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गिरगाव चौपाटी परिसरात असलेल्या खाण्याच्या स्टॉलपर्यंतच जाऊ दिले जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. फोटो काढणे, सेल्फी काढण्यासाठी अनेकजण पुढे जात असल्याने त्यांना रोखण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. समाज माध्यमांवर अनेक ग्रुपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल केले जात आहे. कुठे लाटा तर कुठे घरात पाणी शिरले असल्याचे हे व्हिडिओ आहेत. अमूक ठिकाणांची नावे देऊन ये ठिकाणचे व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे. मात्र बिपर्जय चक्रीवादळाबाबत खात्री केल्याविना कोणतेही व्हिडिओ व्हायरल करून अफवा पसरवू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.