मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळ अमृत महोत्सवीवर्षानिमित्त बसमध्ये नवे प्रवासीपूरक बदल करत असून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची चाचपणी महामंडळाने सुरू केली आहे. मध्यरात्री चालकांना तंद्री लागून होणारे अपघात टाळण्यासाठी उत्तराखंड परिवहन विभागाने मोबाइल ॲप तयार केले आहे. याच धर्तीवर एसटी महामंडळानेही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पावले टाकली आहेत. एसटीची प्रतिष्ठित सेवा असलेल्या रातराणी बसला नवा साज देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ५० बसगाड्या बांधण्यात येणार आहेत. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून बसबांधणी सुरू करण्याचे नियोजन आहे. मध्यरात्री होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपत्कालीन सुविधांसह तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. उत्तराखंडमधील बसमध्ये प्रवासी सुरक्षेकरिता चालकांसाठी मोबाइल ॲप तयार केले आहे. बस सुरू करण्यापूर्वी मोबाइलमधील ॲप सुरू करून तो डॅशबोर्डवर ठेवल्यानंतर चालकांची देहबोलीची डोळ्यातील पापण्यांच्या हालचाली ॲपमध्ये टिपण्यात येतील.
विशिष्ट वेळेनंतर देखील स्टेअरिंगवर हात नसल्यास किंवा मध्यरात्री चालकाला तंद्री लागल्यास इशारा देऊन चालकांना दक्ष राहण्याच्या सूचना अलार्मच्या मदतीने देण्यात येतात. विशेष म्हणजे, आदर्श चालकांसाठी काय करावे आणि काय करू नये या सूचनांसह चालकांचे मूल्यांकन करण्याची सुविधा ॲपमध्ये आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यात ई-शिवनेरी, शिवनेरी, शिवशाही, शिवाई आणि साध्या गाड्या धावत आहेत. ई-शिवनेरी, शिवनेरीसारख्या काचबंद वातानुकूलित बसगाड्यांमध्ये आपत्कालीन सुविधा म्हणून छोटी हातोडी आहे. बस गाड्यांमधील आपत्कालीन दरवाजे कार्यरत आणि अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत राखावी, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. अन्य सुरक्षिततेच्या उपाययोजनांची फेरतपासणी करावी, अशा दक्षतेच्या सूचना वाहतूक विभागाने सर्व स्थानक-आगार आणि विभागांना दिलेल्या आहेत.
उत्तराखंडमधील बसमध्ये चालकांकडून वापरात येणारे ॲप प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने यशस्वी ठरत असल्याची बाब समोर आली आहे. एसटी महामंडळातील चालकांसाठी याचा वापर करण्यासाठी अभ्यास सुरू करण्यात आला आहे. लवकरच एसटीच्या वरिष्ठ अधिकारी उत्तराखंडमध्ये जाणार आहेत. प्रत्यक्ष पाहणीत तंत्रज्ञान प्रवासी सुरक्षेसाठी यशस्वी ठरल्यास याचा वापर एसटी चालकांसाठी करण्यात येणार आहे, असे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.