मुंबई : प्रवाशांकडून अधिक भाडे उकळणारे रिक्षा आणि टॅक्सीचालकांकडे पोलिसांनी लक्ष वळवले आहे. प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या चालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून, गुरुवारी पहिल्याच दिवशी ६९ टॅक्सी-रिक्षाचालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जवळचे भाडे नाकारणे, मुख्य रस्त्यावरच सोडणे, जवळचा रस्ता असतानाही जाणीवपूर्वक वळसा मारून नेणे असे प्रकार रिक्षा-टॅक्सीचालकांकडून घडतात. त्याचबरोबर मीटरमध्ये छेडछाड करणे, मीटर न वापरता मनमानी भाडे आकारणे अशाही तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत वाहतूक शाखेचे पोलीस सहआयुक्त प्रवीण पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी जास्त भाडे आकारणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी ६९ चालकांवर सुमारे ३४ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे.
विमानतळ, रेल्वे स्थानके, शहराबाहेरून येणाऱ्या बसचे थांबे याकडे पोलिसांकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. या ठिकाणी उतरणारे अनेक प्रवासी हे पर्यटक असतात. मुंबईबद्दल त्यांना फार काही माहिती नसते. याच परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कमी अंतरासाठी टॅक्सी, रिक्षाचालक जास्त भाडे उकळतात. अशा ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून विशेष नजर ठेवली जाणार आहे. जास्त भाडे आकारून प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या चालकांवर मोटार वाहन कायदा कलम २१ (१२) अंतर्गत कारवाई केली जात आहे. मोटार वाहन कायदा कलम १७७ अंतर्गत जास्त भाडे आकारणाऱ्या चालकांना दंडात्मक शिक्षेची तरतूद आहे. कुणी चालकाने भाडे अधिक आकारल्यास किंवा तसा संशय आल्यास प्रवाशांनी नेमणुकीला असलेल्या वाहतूक पोलिसाच्या निदर्शनास आणून द्यावे अथवा संबंधित वाहनाच्या क्रमांकासह जवळच्या वाहतूक पोलीस चौकीमध्ये तक्रार करावी, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.