मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांच्याकडे सिद्धिविनायक न्यासाची जबाबदारी होती. सदा सरवणकर दादर-माहिम मतदारसंघातून आमदार आहेत. शिंदे गटाच्या बंडावेळी त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सदा सरवणकरांनी ठाकरेंची साथ सोडली आणि एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. याच निष्ठेचं फळ त्यांना मिळाल्याची चर्चा आहे. शिवसेनेत सदा सरवणकर यांनी अनेक महत्त्वाच पदे भूषवली आहेत. शिंदेंसोबत आल्यानंतर त्यांची मंत्रिपदी वर्णी लागेल अशी चर्चा होती. मात्र राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या सिद्धिविनायक मंदिर न्यासच्या अध्यक्षपदाची संधी त्यांना मिळाली आहे. ६ नोव्हेंबरपासून पुढील ३ वर्ष त्यांचा कार्यकाळ असणार आहे.
सदा सरवणकर २००४ मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले. २००९ मध्ये मात्र सदा सरवणकरांना तिकीट नाकारत पक्षाकडून आदेश बांदेकरांना तिकीट देण्यात आलं. त्यावेळी सदा सरवणकरांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश करत २००९ ची निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत मनसेच्या नितीन सरदेसाई विजयी झाले. त्यानंतर पुन्हा शिवसेनेत परतत २०१४ मध्ये आणि त्यानंतर २०१९ मध्ये सदा सरवणकर सलग दोनदा आमदार म्हणून निवडून आले. शिवसेनेत सक्रीय असताना जुलै २०१७ रोजी आदेश बांदेकर यांच्याकडे सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. २०२० मध्ये त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सिद्धिविनायक मंदिर न्यासावर त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली. यानंतर २३ जुलै २०२३ रोजी त्यांचा कार्यकाळ संपला होता.