मुंबई : ऑनलाईन फसवणूक झाल्यास तत्काळ स्थानिक पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार दाखल केल्यास फसवणुकीची अधिकाधिक रक्कम परत मिळू शकते, हे दहिसर पोलिसांनी दाखवून दिले आहे. अशाच एका फसवणुकीत ९० टक्के रक्कम परत मिळविण्यात व उर्वरित रक्कम गोठविण्यात यश मिळवले आहे.
दहिसर पूर्व येथे राहणारे किरीट गोरे यांना त्यांच्या एचडीएफसी बॅंकेच्या खात्यातून सुरुवातीला २४ हजार ५०० रुपये ॲमेझॅान गिफ्ट कार्डद्वारे वळते गेल्याचा संदेश आला. या पाठोपाठ असेच संदेश आले आणि गोरे यांच्या खात्यातून तीन लाख १९ हजार रुपये तोपर्यंत वळते झाले होते. याबाबत गोरे यांना कुठलाही ओटीपी न येताही ॲमेझॅान गिफ्ट कार्डवर पैसे वळते झाले. सेवानिवृत्तीनंतर मिळालेली ही रक्कम होती. गोरे यांनी तत्काळ दहिसर पोलील ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक प्रवीण पाटील यांनी तत्काळ दखल घेत गोरे यांची तक्रार नोंदवून घेतली. महिला पोलीस निरीक्षक राणी पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर विभागाचे सहायक निरीक्षक अंकुश दांडगे, उपनिरीक्षक राजेश गुहाडे तसेच श्रीकांत देशपांडे व नितीन चव्हाण यांनी तत्काळ तपास सुरू केला. ॲमेझॉनच्या नोडल अधिकारी यांना मेलद्वारे व मोबाईलवर संपर्क करून पाठपुरावा करून गोरे यांचे दोन लाख ६९ हजार परत मिळवून दिले. तसेच उर्वरित रक्कम गोठविण्यात आली असून तीही गोरे यांना मिळण्याची शक्यता आहे. ऑनलाईन फसवणूक झाल्यास तत्काळ तक्रार दाखल झाल्यास फसवणुकीची रक्कम परत मिळू शकते. त्यामुळे एकत्र ऑनलाईन फसवणुकीला बळी पडू नका. तशी घटना घडली तर पोलिसांकडे तत्काळ तक्रार नोंदवा, असे आवाहन उपायुक्त स्मिता पाटील यांनी केले आहे. आपली रक्कम परत मिळेल किंवा नाही याबाबत आपण साशंक होतो. परंतु पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे हे शक्य झाल्याचे गोरे यांनी सांगितले.