मुंबई : मुंबईत धावत्या लोकलमध्ये परीक्षेला निघालेल्या विद्यार्थीनीवर एका नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, ही घटना अत्यंत संतापजनक असून राज्यातील गृहखाते निगरगठ्ठ झाले आहे. गेल्या काही दिवसात राज्यात महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ चिंताजनक असून गृहखात्याच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशा तीव्र शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त करत या घटनेचा निषेध केला आहे.
दरम्यान या घटनेचा युध्दपातळीवर गांभिर्याने तपास पूर्ण करुन सुरक्षा व्यवस्थेतील हलगर्जीपणाची चौकशी करण्याची मागणी अजित पवार यांनी आज येथे केली.
मुंबईत लोकलच्या हार्बर मार्गावर धावत्या लोकलमध्ये सकाळच्या वेळेत विद्यार्थीनीवर अत्याचाराची घटना घडली. परीक्षेला जात असताना विद्यार्थीनीसोबत सकाळी साडे सातच्या सुमारास हा प्रकार घडला. ही घटना घडली त्या लोकलच्या महिला डब्यांमध्ये पोलीस सुरक्षा व्यवस्था का नव्हती ,याला कोण जबाबदार आहे, सुरक्षा व्यवस्था असती तर एका विद्यार्थीनीवरील हा गैरप्रसंग टाळता आला असता असेही अजित पवार म्हणाले.
पीडित महिलेने बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून (सीएसएमटी) हार्बर लाइनची लोकल पकडली. ती गिरगावात राहते व नवी मुंबईतील बेलापूर येथे एका परीक्षेसाठी जात होती. ट्रेन स्थानकावरून निघताच आरोपी महिलेच्या डब्यात शिरला. त्यावेळी हा डबा रिकामा होता. त्यानंतर संधी साधून त्याने त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार अत्याचार केला. मस्जिद स्थानक येताच पीडित तरुणीने ट्रेनमधून उतरून थेट पोलिसांत तक्रार दाखल केली होती.