मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींबाबत मोठं विधान केलं आहे. विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्याचा ठराव मंजूर झाल्याने आनंदी नसल्याचा दावा अंजली दमानियांनी केला. तसेच इतरवेळी अजित पवार शुल्लक विषयांवरही माध्यमांशी बोलतात, पण आज ते एक शब्दही न बोलता निघून गेल्याचंही निरिक्षण त्यांनी मांडलं. त्या शुक्रवारी (५ मे) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होत्या.
अंजली दमानिया म्हणाल्या, “आपल्या नेत्याने राजीनामा परत घेण्याचा प्रस्ताव मंजूर होणार असेल आणि आनंद झाला असेल तर चेहऱ्यावर हास्य असायला हवं होतं. मात्र, तो आनंद अजित पवार यांच्या चेहऱ्यावर दिसला नाही. ते बाहेर आल्यावर माध्यमांशी बोलले नाहीत. इतरवेळी अजित पवार शुल्लक विषयांवरही माध्यमांशी बोलतात, पण आज ते एकही शब्द न बोलता निघून गेले आहेत.”
दमानिया पुढे म्हणाल्या, “मला असं वाटतं की, प्रफुल्ल पटेल या निर्णयाविरोधात असतील. मात्र, शरद पवार यांनी डाव केला. मी याला डाव म्हणत आहे कारण हा राजीनामा सर्वांनी मिळून नामंजूर करण्याचा प्रस्ताव आणला गेला आणि तोही प्रफुल्ल पटेल यांनाच तो प्रस्ताव ठेवायला सांगितला.”
“शरद पवार यांनी दिलेला राजीनामा हा त्यांचा स्टंटच होता. कारण त्यांना दिसत होतं की, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि इतर काही लोकांना भाजपाबरोबर जायचं होतं. त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठीच हे नाट्य होतं. सगळे कार्यकर्ते असलेल्या सभेत असा राजीनामा देणं मला गमतीचं वाटलं. प्रफुल पटेल आणि अजित पवार दोघेच होते जे नवा अध्यक्ष निवडला गेला तर चालेल, असं म्हटले होते. त्याच व्यक्तींना तो प्रस्ताव मांडायला लावणं, पत्रकार परिषद घ्यायला लावणं आणि तोच प्रस्ताव घेऊन सिल्व्हर ओकवर जाणं हे एक मोठं षडयंत्र आहे,” असा गंभीर आरोप दमानियांनी केला.