मुंबई : राज्यातील शिक्षकांना मे महिन्याची सुट्टी लागली असल्यामुळे मतदार नोंदणीचे काम कसे करणार त्यामुळे शिक्षकांनी सुट्टीमध्येही मतदार नोंदणीचे काम करण्यासाठी तातडीने हजर रहाण्याचे आदेश निवडणूक प्रशासनाने दिले असून त्याची अंमलबजावणी न केल्यास शिक्षकांवर फौजदारी खटले दाखल करावेत अशी लेखी मागणी नोंदणी अधिकाऱ्यांनी समता नगर पोलीस ठाण्यात केली आहे.
राज्यातील शाळांना मे महिन्याची सुट्टी लागली असल्यामुळे अनेक शिक्षक आपल्या हक्काच्या सुट्टीत गावी जातात. शिक्षक सुट्टीवर गेले तर निवडणुकीचे काम कसे करणार असा सवाल उपस्थित करत प्रशासनाने शिक्षकांना मतदार नोंदणीच्या कामासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अनेक शिक्षक गावी असल्यामुळे निवडणूक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी समतानगर पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देऊन फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या या हालचालीमुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये भीतीचे आणि नाराजीचे वातावरण पसरले आहे. शाळा सुरु असल्यामुळे शिक्षकांना वर्षभर सुट्ट्या घेणे शक्य होत नसते. त्यामुळे मे महिन्यात शाळांना सुट्टी लागताच शिक्षक आपापल्या गावी किंवा बाहेर कुठेतरी फिरवयास जातात. राज्यातील होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा आणि पालिकेच्या निवडणुकांमुळे निवडणूक आयोगाकडून राज्यातील शिक्षकांना मतदार नोंदणीचे अतिरिक्त काम देण्यात येते. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या कार्यालयात हालचाली वाढल्यामुळे शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.