मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतानाच अधिकाधिक गणेशमूर्तींचे विसर्जनही कृत्रिम तलावात व्हावे, यासाठी मुंबई महापालिकेने यंदा अशा तलावांची संख्या दुप्पटीने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदा ३०८ कृत्रिम तलाव उभारण्यात येणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. निसर्गास कोणत्याही प्रकारची हानी न होता पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने पालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. त्याचा भाग म्हणून दरवर्षी विसर्जनाच्या वेळी कृत्रिम तलावही उभारण्यात येतात. अशा तलावांतच गणेशमूर्तींचे विसर्जन होण्यासाठी त्याआधी जनजागृतीही केली जाते. यामुळे गेल्या काही वर्षांत मुंबईकरांकडून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी १५४ कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते. यामध्ये सार्वजनिक आणि घरगुती अशा ६६ हजार १२७ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले होते. यंदा ही संख्या वाढावी यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कृत्रिम तलावांची संख्या ३०८ केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी सांगितले.
प्रत्येक विभागात १५ ते २० किंवा ३० ते ३५ कृत्रिम तलाव उभारण्यात येतील. सर्व घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करणे बंधनकारक आहे. तसेच, विसर्जनस्थळी पालिकेचे कर्मचारी तैनात करून कमी उंचीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तींचे विसर्जनही याच तलावात करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. एकूणच ‘पीओपी’ मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे बिरादार म्हणाले.
शाडूच्या, तसेच पर्यावरणपूरक साहित्यांपासून गणेशमूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने यावर्षी प्रायोगिक स्तरावर ‘प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर काही जागा नि:शुल्क स्वरूपात उपलब्ध करून देण्याची घोषणा पालिकेने केली होती. त्यांना काही प्रमाणात शाडू मातीदेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मूर्तिकार आणि गणेशमूर्ती साठवणूकदारांसाठी ७ जुलै ते २३ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन अर्जाची सोय आहे. ७ जुलैपासून आतापर्यंत ५० अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये ४५ अर्जदार हे मूर्तिकार आणि पाच अर्ज हे साठवूणकदारांचे आहेत.