मुंबई : ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि शहीद आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुबीयांप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी राबविण्यात येत आहे. या अभियानाच भाग म्हणून महाराष्ट्रात ‘सेल्फी विथ मेरी माटी’ उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला असून याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये झाली आहे. ही बाब अभिमानाची असल्याचे सांगून राज्यपाल रमेश बैस यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
मुंबई विद्यापीठाच्या कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेल्फी विथ मेरी माटी’ उपक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद झाल्याबद्दल प्रमाणपत्र प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, गिनीज बुक रेकॉर्ड भारतातील प्रतिनिधी ऋषिनाथ ॲड्ज्युरिकेटर उपस्थित होते.
या उपक्रमामध्ये ४० विद्यापीठातील ७ हजार महाविद्यालयातील २५ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवण्यास प्रोत्साहित करणाऱ्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अभिनंदन करून २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपाल यांनी युवकांना केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या नव्या आवृत्तीचे, ई-बुक आणि ऑडिओ बुकचे यावेळी प्रकाशन झाले याचा आनंद आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात, नाटक, कथा, कादंबरी, लोककथा, प्रवासवर्णन आदी लेखन केले. त्यांच्या साहित्याचे भारतीय आणि विदेशी भाषेत सुद्धा अनुवाद झाले आहे. त्यांचे साहित्य पुनर्मुद्रीत करून ई-बुक तयार केल्याबद्दल राज्यपालांनी समितीचे अभिनंदन केले. लोकशाहिरांचे साहित्य वाचण्याचे आणि देशातील लोकांची सेवा करण्याचे आवाहन राज्यपालांनी युवकांना केले.