मुंबई : महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ डिसेंबरमध्ये निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्यांची नेमणूक व्हावी, यासाठी ३० वर्षे सेवा झालेल्या सर्व ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाने मागवून घेतली आहेत. सध्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे नियमानुसार केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात आली आहेत. सध्या सशस्त्र सीमा दलाच्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या महासंचालकपदावर कार्यरत असलेल्या रश्मी शुक्ला या सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहेत. मात्र, टॅपिंग प्रकरणातील त्यांची भूमिका लक्षात घेता त्यांना महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक केल्यास वाद होतील काय, याबद्दल संभ्रम आहे. राजकीय आक्षेपांमुळे काही वर्षांपूर्वी अनामी रॉय यांना निवडणूक काळात महासंचालकपदावरून दूर करून काही काळ डॉ. पी. एस. पसरिचा यांच्याकडे या पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवली होती, अशी उल्लेखनीय बाब सूत्रांनी स्पष्ट केली. लोकसेवा आयोगाच्या विचारणेनुसार शुक्ला यांच्याबरोवरच १९८९ तुकडीतील संदीप बिश्णोई, विवेक फणसळकर, प्रज्ञा सरवदे, भूषणकुमार उपाध्याय; तर १९९० तुकडीच्या जयजितसिंग, संजय वर्मा, अतुलचंद्र कुलकर्णी, बिपीनकुमार सिंग यांची नावे पाठवली आहेत. १९९२ च्या तुकडीचे प्रशिक्षण काही तांत्रिक कारणांमुळे १९९३ मध्ये झाल्याने या अधिकाऱ्यांनी अद्याप ३० वर्षांची सेवा अट पूर्ण केलेली नाही, असे समजते.
ठाण्याचे विद्यमान पोलिस आयुक्त जयजितसिंग यांना दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. शिवाय त्यांची पदोन्नतीही झाली आहे. त्यामुळे आता ठाण्याला नव्या आयुक्ताची प्रतीक्षा आहे. शिवसेनेचा कल अमिताभ गुप्ता किंवा प्रशांत बुरडे यांच्याकडे असून भाजपची पसंती आशुतोष डुंबरे किंवा निकेत कौशिक यांना आहे, असेही सांगितले जात आहे. महायुतीत तीन पक्ष आहेत. समन्वयाने निर्णय घेतला जाईल. पोलिस आयुक्तपदाबाबत कोण कुणाचे अशी चर्चा गृहखाते सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना मान्य नाही, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, ठाणे जिल्हा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कर्मभूमी असल्याने पोलिस आयुक्त कोण, याला महत्त्व आले आहे.