मुंबई : करोनासंकटात जिवाची बाजी लावून लढणाऱ्या महापालिकेच्या २३७ कर्मचाऱ्यांच्या वारसांना आतापर्यंत प्रत्येकी ५० लाख रुपये आर्थिक मदत मिळाली आहे. यामध्ये पालिकेकडून २१४, तर २३ जणांना केंद्र सरकारकडून मदत करण्यात आली आहे. पालिकेने आतापर्यंत १६५ कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत सामावून घेत नोकऱ्या दिल्या आहेत. मुंबईत मार्च २०२०मध्ये करोनाने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच त्याचा वेगाने प्रसार झाला. मात्र पालिकेच्या हजारो कर्मचाऱ्यानी आपल्या जिवाची पर्वा न करता काम केले. अनेक कर्मचाऱ्यांनी घरीदेखील न जाता हॉटेलमध्ये राहून आपत्कालीन सेवा बजावली. यामध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश होता. केंद्र सरकारने करोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांची आर्थिक भरपाई देण्याचे जाहीर केले होते. यानुसार पालिकेनेही ५० लाखांची मदत आणि कुटुंबातील एका वारसाला नोकरी देण्याचे जाहीर केले होते. केंद्राकडून फक्त आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांना मदत दिली जात, असून पालिका आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करत आहे.
आर्थिक मदतीसाठी पालिकेने केंद्राकडे सर्व प्रस्ताव पाठवले होते. केंद्राच्या छाननीत काही प्रस्ताव नाकारण्यात आले असले तरी पालिकेने मदत केली आहे. या लढ्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांपैकी पालिकेकडे आतापर्यंत २४६ जणांनी नोकरीसाठी अर्ज केले आहेत. यामध्ये १६५ जणांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत, तर शिल्लक प्रकरणांमध्ये आवश्यक कार्यवाही सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. या काळात एकूण सात हजार ५९२ पालिका कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली, तर २८२ कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. सर्वाधिक ६३ मृत्यू घनकचरा विभागात झाले आहेत. आरोग्य खात्यात ४८ जणांनी करोनामुळे जीव गमावला आहे. मृतांमध्ये खातेप्रमुख २, करनिर्धारण व संकलन ७, अग्निशमन खाते १२, सुरक्षा खाते १४ आणि इतर विभागांतील ११२ जणांचा समावेश आहे.