मुंबई : अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनातर्फे ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी ४३ हजार हेक्टर जागा शोधण्यात आली आहेत. या जागेवर सदनिका उभारण्यासाठी चाचपणी करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे २०२० मधील गिरणी कामगारांच्या जाहीर सोडतीतील बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलमधील पात्र व सदनिकेच्या विक्री किमतीचा मुद्रांक शुल्काचा भरणा केलेल्या २५१ गिरणी कामगारांना व त्यांच्या वारसांना सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माणमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यांतर्गत सदनिकांच्या चाव्या व वितरणपत्र देण्यात आले. मुंबईतील अनेक रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देऊन नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. शासनाने बी.डी.डी चाळ पुनर्विकास प्रकल्प, धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेतले आहेत. या माध्यमातून मुंबईतून बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. तर संनियंत्रण समिती नेमल्यामुळे गिरणी कामगारांची पात्रता निश्चित करण्याच्या आणि घरे वाटप करण्याच्या कामाला गती मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबईबरोबरच देशाच्या जडणघडणीत तसेच राजकीय, सामाजिक चळवळीत गिरणी कामगारांचे मोठे योगदान असल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.