मुंबई : तलावांमध्ये समाधानकारक पाणीसाठा नसल्याने महापालिकेने मुंबईत दहा टक्के पाणीकपात केली आहे. प्रत्यक्षात मात्र ही कपात ४० ते ५० टक्के असल्याचा दावा मुंबईच्या विविध भागांतून केला जातो आहे. शहर आणि पूर्व, पश्चिम उपनगरातील अनेक भागात तसेच शिवडी, भांडुप, विक्रोळी पार्कसाईट, घाटकोपर असल्फा परिसर या डोंगराळ पट्ट्यात पुरेशा प्रमाणात पाणी पोहोचत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाई जाणवत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे करण्यात येत आहेत. पाऊस कमी असल्याने तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा जमा झालेला नाही. त्यामुळे जूनच्या अखेरीस दहा टक्के पाणी कपातीचा निर्णय पालिकेला घ्यावा लागला. कपातीमुळे दररोज ५०० दशलक्ष लिटर पाण्याची बचत होत असली, तरी अनेक भागात पाण्याला दाब नाही, पुरेसे पाणी मिळत नाही, पाणीपुरवठ्याची वेळ कमी होणे यासह अनेक प्रकारच्या तक्रारी नागरिकांकडून पालिका आणि संबंधित भागातील माजी नगरसेवकांकडे करण्यात आल्या आहेत. शिवडी येथील ठोकरसी जीवराज चाळ (जुन्या पोष्टाच्या चाळी) कमिटीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा होत असून रहिवासी त्रस्त झाल्याचे आपल्या पत्रात म्हटले आहे. पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जीर्ण झाली असल्याने ती बदलून द्यावी व पाण्याचा दाब वाढवून द्यावा, अशी मागणी केली आहे.
काँग्रेस नेते व माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, शिवडीतील शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी नगरसेवक सचिन पडवळ, अंधेरी, विलेपार्ले येथील भाजपचे माजी नगरसेवक अभिजीत सामंत, घाटकोपर येथील भाजपचे माजी नगरसेवक प्रवीण छेडा यांनी आपल्या भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई असल्याचे सांगितले. अनेक भागात कमी पाणी येत असल्याची माहिती दिली. राजा व पडवळ यांनी शहर भागात २५ ते ४० टक्के तर पूर्व, पश्चिम उपनगरात सुमारे ४० ते ५० टक्क्यांपर्यंत पाणीकपात असल्याचा दावा छेडा व सामंत यांनी केला आहे. पालिकेचे जल अभियंता चंद्रकांत मेतकर यांच्याकडे विचारणा केली असता, मीटिंगमध्ये असल्याचे सांगत प्रतिक्रिया करण्यास नकार दिला.
कपातीमुळे विभागवार कमी पाणीपुरवठा होतो आहे. विलेपार्ले, अंधेरी पूर्वेला पाणीपुरवठा करणाऱ्या वेरावलीच्या जलाशय टाक्यांमध्ये अपेक्षित पाणी पातळी (लेव्हल मेंटेन) राखली जात नसल्याने पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्यामध्ये कपात ही १० ते १५ टक्के न राहता काही विभागांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत जात आहे. ही बाब उपजलअभियंता व इतर अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी किमान लेव्हल राखून ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिल्याचे सामंत यांनी सांगितले. तर पडवळ यांनी, गोलंजी हिल जलकुंभात आधी दररोज २२ दशलक्ष लिटर पाणी येत होते. कपातीमुळे आता १८ ते १९ दशलक्ष लिटरपर्यंत येते, अशी माहिती दिली.
पाणीसाठा ३४ टक्क्यांवर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये मिळून सोमवारी, १७ जुलै रोजी पाणीसाठा जेमतेम ३४.९ टक्क्यांपर्यंत, म्हणजे ४ लाख ९३ हजार ३३४ दशलक्ष लिटरवर पोहोचला होता. गेल्या वर्षी याच दिवशी साठा ८२.९ टक्के म्हणजे ११ लाख ८८ हजार १४३ दशलक्ष लिटर इतका होता.
शहर
– इंदिरानगर, शिवडी पूर्व, हिरजी बाग, गोलंजी हिल
– सायन, वडाळा परिसरात इंदिरानगर, नेहरूनगर, अल्मेडा कम्पाऊंड, बरकत अली नगर, शेख मिस्त्री दर्गा.
पूर्व उपनगर
घाटकोपर : महात्मा गांधी रोड, ओबडभाई लेन, राजावाडी रुग्णालय परिसर, ६० फुटी रोडचा काही भाग
पश्चिम उपनगर
जोगेश्वरी : सोसायटी रोड, सरस्वती बाग, शिव टेकडी, प्रजापूर पाडा
अंधेरी : धोबीघाट तेली गल्ली, महाकाली दर्शन एसआरए गुंदवली, साईवाडी, कोलडोंगरी गल्ली क्रमांक १ ते ३, छत्रपती संभाजी महाराज नगर, विजय नगर सोसायटी, जीवन विकास केंद्र कोलडोंगरी
विलेपार्ले : तेजपाल स्कीम, शहाजी राजे रोड, सुभाष रोड
मरोळ : मरोळ पाईप लाईन, तरुण भारत सोसायटी