मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहेत. राज्य निवडणूक आयोगानं याबद्दलचे संकेत दिले आहेत. त्यामुळेच लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. कोविड संकट, त्यानंतर राज्यात सुरू झालेला सत्तासंघर्ष, शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत पडलेली उभी फूट यामुळे राजकीय घडामोडी वेगानं सुरू आहेत. राज्यातील अनेक महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदांचा कालावधी अनेक महिन्यांपूर्वीच संपला आहे. त्यामुळे इथला संपूर्ण कारभार प्रशासनाच्या हाती आहे.
१ जुलै २०२३ दिवशी अस्तित्त्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार याद्या सप्टेंबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानं रखडलेल्या निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू केल्याचं म्हटलं जात आहे. या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान होऊ शकतात. त्यामुळे लवकरच राज्यभरात निवडणुकांचा धुरळा उडू शकतो.