मुंबई : ‘शिशू वर्गापासूनच मुलांचा बौद्धिक आणि शैक्षणिक विकास व्हावा, यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ शिशूवर्गाचे (ज्युनियर केजी, सीनियर केजी) शिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाप्रमाणेच मराठी आणि इतर माध्यमांच्या मुलांचा शैक्षणिक पायाही पक्का होईल,’ असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. सध्या बहुतांश खासगी शाळांमध्येच ज्युनियर, सीनिअर केजीचे वर्ग असतात. त्याप्रमाणेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये लवकरच असे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.
मुंबई महापालिकेच्या दहिसर पश्चिम येथील सखाराम तरे मुंबई पब्लिक स्कूल इमारतीचे लोकार्पण केसरकर यांच्या हस्ते पार पडले. त्या वेळी ते बोलत होते. यंदापासून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यात आले आहे. त्यांना वह्या मोफत दिल्या असल्या, तरीही त्या शाळेत न आणता घरीच अभ्यास करायचा आहे. दररोज शाळेत येताना सर्व विषय एकत्र असलेले एकच पुस्तक आणायचे आहे. याच पुस्तकात धडा संपल्यानंतर वह्यांची कोरी पाने जोडण्यात आली आहेत. त्यामुळे धडा समजून घेतल्यानंतर त्या विषयाचे महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थी लिहू शकतात. अशा प्रकारची चार पुस्तके वर्षभरासाठी देण्यात आली असल्याचे केसरकर यांनी नमूद केले.मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये लवकरच रोबोटिक, विज्ञान आणि भाषा विषयासंदर्भातील प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. दहिसर परिसरात सातवीपर्यंत असलेल्या शाळा लवकरच आठवी ते १०वीपर्यंत करण्यात येतील. शाळा इमारतींच्या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू केले जाईल.