मुंबई : वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुधाकर शिंदे यांनी महात्मा फुले जन आरोग्य अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दमदार कामगिरी केली होती. विशेष करून कोविड काळात महात्मा फुले जन आरोग्य अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शिंदे यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. दीर्घकाळ ते या पदावर होते. कोविड काळात मास्कचे दर नियंत्रणाबाबत त्यांनी घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण ठरला. तसेच खाजगी प्रयोगशाळांमध्ये आरटीपीसीआरचे दर निश्चित करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता. ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांची मंत्रालयात उपसचिव पदी बदली करण्यात आली होती. मात्र ही बदली लगोलग रद्द करण्यात आली आणि जन आरोग्य अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची जबाबदारी कायम ठेवण्यात आली. राज्यात सत्ता बदल होऊन शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर सुधाकर शिंदे यांच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती महात्मा फुले जन आरोग्य अभियानात करण्यात आली.
गेले काही महिन्यांपासून सुधाकर शिंदे नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. आरोग्य क्षेत्रातील त्यांचा अनुभव पाहता महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून आरोग्य विभागाची विशेष जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे. पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय पदवी मिळाल्यानंतर डॉक्टर शिंदे यांची यूपीएससी मार्फत इंडियन रेवेन्यू सर्विसेस मध्ये निवड झाली होती. रेवेन्यू सर्विसेस मध्ये काही काळ काम केल्यानंतर ते प्रशासकीय अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सेवेत रुजू झाले. पनवेल महापालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर त्यांच्याकडे महात्मा फुले जन आरोग्य अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली. आता त्यांच्याकडे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पद हे प्रशासकीय वर्तुळात अत्यंत प्रतिष्ठेचे पद मानले जाते.