मुंबई : पंकजा मुंडे भाजपा माझ्या पाठीशी आहे असंच म्हणाल्या मात्र त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना स्पष्ट केले. मी भाजपची आहे, पण भाजप थोडीच माझा आहे’, असे जाहीर वक्तव्य करून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपला उदग्वेद व्यक्त केल्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण आले. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावरून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. भाजप माझ्या पाठिशी आहे, असंच पंकजाताई म्हणाल्या, असे बावनकुळे म्हणाले.
“मी भाजपची आहे, पण भाजप ही पार्टी माझी थोडीच आहे. मला भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईन. आम्हाला काही गमवायचंच नाही. आम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा नाही असे धाडसी वक्तव्य पंकजा मुंडे यांनी दिल्लीत आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात केले. त्यामुळे भाजपा आणि राजकिय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा संपूर्ण विपर्यास करण्यात आला आहे. मी त्यांचे संपूर्ण भाषण ऐकलेले आहे. पंकजाताई यांनी भाजपबद्दल बोलताना पक्ष माझ्या पाठीशी आहे असे वक्तव्य केले आहे. पंकजाताई भाजपच्या नेत्या आहेत. त्यांच्या बोलण्याचा नेहमीच विपर्यास केला जातो. पंकजाताई ज्या पद्धतीने महाराष्ट्रात फिरत आहेत, पक्षाच्या जनसंपर्क अभियानात त्या सहभागी झाल्या आहेत. मध्यप्रदेशात त्यांच्या अनेक सभा होत आहेत. त्यामुळे कोणत्याही विषयाला धरुन त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात संभ्रम निर्माण करणे चूक आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस नेहमी बोलत असतो. त्या थोडंही बोलल्या तर त्याचा विपर्यास केला जातो असे मला वाटते, असेही बावनकुळे म्हणाले…