मुंबई : निळू फुले यांची कन्या गार्गी फुले हिने राजकारणात प्रवेश केला आहे. गार्गी फुले यांनी आज राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर गार्गी फुले म्हणाल्या की गेल्या अनेक दिवसांपासून माझी अजित पवार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे मला विचारणा केल्यानंतर मी लगेचच पक्ष प्रवेशासाठी हो म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी विचारसरणी आहे, तीच माझ्या बाबांची म्हणजेच निळू फुले यांची विचारसरणी होती. माझ्या वडिलांच्या विचारांना राष्ट्रवादी काँग्रेस न्याय देईल असेही त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासोबत माझ्या वडिलांचे चांगले संबंध होते. पक्षासाठी काहीतरी चांगलं करण्याची माझी खूप इच्छा आहे. राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवाहात येऊन काम करायचं मी ठरवलं आहे, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, गार्गी फुले यांनी स्त्रीमुक्ती विषयात पदवी ग्रहण केली असून १९९८ साली त्या प्रायोगिक नाटकाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीसोबत जोडल्या गेल्या. त्याचबरोबर अभिनयाचे शिक्षण त्यांनी सत्यदेव दुबे यांच्याकडे घेतलं आहे. गार्गी फुले यांनी समन्वय नाट्यसंस्थेच्या अनेक प्रायोगिक नाटकात काम केलं आहे.