मुंबई : राहुल गांधी यांची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर राज्यभरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून त्यांनी हुकुमशाही मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले. ठाणे येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली तर पश्चिम द्रुतगती मार्गावर विलेपार्ले येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी ठाणे येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी भाजपा व मोदी सरकारवर सडकून टिका केली. ते पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांच्यावरील कारवाई ही राजकीय द्वेषातून करण्यात आलेली असून त्यामागे कोणती शक्ती आहे हे सर्वांना माहित आहे. राहुल गांधी यांची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली आहे परंतु याविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात दाद मागेल. ही लढाई मोठी आहे आणि देशातील हुकुमशाही विरोधात काँग्रेस लढत आहे.
राहुल गांधी यांनी भ्रष्ट निरव मोदी, ललित मोदी यांच्याविरोधात टीका केली होती.भ्रष्ट लोकांवर टीका केली तर ती एखाद्याच्या जातीविरोधात कशी असू शकते असा सवाल करत देशातील जनतेचे कोट्यवधी रुपये लुटून परदेशात पळवून नेणारे भ्रष्ट निरव मोदी, ललित मोदी, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोण लागतात, त्यावर नरेंद्र मोदी बोलत का नाहीत त्यांच्यावर कारवाई का करत नाहीत अशी खोचक टिका पटोले यांनी केली.
मोदी सरकार घाबरलेले असून सत्तेपासून दूर जात असल्याच्या भितीपोटी ही कारवाई केली आहे. भाजपाची ही कृती लोकशाहीचा गळा घोटणारी तसेच लोकशाहीला कलंक लावणारी आहे असेही ते म्हणाले.
राहुल गांधी यांच्याविरोधात खोटी तक्रार दाखल राहूल गांधी यांना घाबरवण्याचे गलिच्छ राजकारणातून भाजपा करत आहे. देशातील कायदे सर्वांना समान असून काँग्रेसचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया देता येत नाही परंतु राजकीय द्वेषातून राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे अशी टिका नाना पटोले यांनी केली.